Headlines

भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण‎




सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि शाश्वत ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भोकणी ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला आहे. शासनाच्या वन विभागातर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. राज्यभरातून प्राप्त १२१ प्रस्तावांपैकी ८१ प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने भोकणी ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड केली. ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. लोकसहभागातून व्यापक वृक्षलागवड व संवर्धन, प्रभावी पाणी व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, अक्षय ऊर्जेचा वापर आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे उपक्रम राबविण्यात आले. सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची वाटचाल यापुढेही अशी सुरूच राहील छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारामुळे गावाचा गौरव वाढला असून, तो परिसरातील व तालुक्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल. लोकसहभागातून वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणावर भर देण्यात आला. उन्हाळ्यात स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यातील व विहिरीतील पाणी वृक्षांच्या संगोपनासाठी वापरले. यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू. गावकऱ्यांची व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याने हे यश मिळाले, असे सरपंच अरुण वाघ यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *