Headlines

श्रावणोत्सव:कुडलसंगमच्या धर्तीवर मांजरा नदीपात्रात उभारले जागृत "श्रीरामलिंगेश्वर'




तालुक्यातील जवळगा येथील मांजरा नदीपात्रात वसलेले श्रीरामलिंगेश्वर देवस्थान हे पंचक्रोशीतील एक जागृत आणि ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले एकमेव देवस्थान आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने या कुडलसंगमच्या धर्तीवर उभारलेल्या अनोख्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. जवळगा गाव पूर्वी दंडकारण्याचा भाग होते. दक्षिणेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी नदीपात्रात रामलिंगेश्वराच्या पिंडीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. यावरून गावाचे नाव ‘रामलिंग जवळगा’ करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. धनेगाव उच्चस्तरीय बॅरेजमुळे ही मूळ पिंड पाण्याखाली जाणार होती. मात्र, भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून लिंगैक्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (अहमदपूरकर), ग्रामस्थ व नांदेड येथील सुपुत्र बालाजी जाधव यांच्या पुढाकाराने नदीपात्रातच कुडलसंगमच्या धर्तीवर हे गोल मंदिर उभारण्यात आले. हे देवस्थान सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण आहे. येथे सर्वधर्मीय भाविक दर्शनाला येतात. रामलिंगेश्वर हे केवळ एका धर्माचे नसून सर्वजातीधर्माचे लोक येथे श्रद्धेने येतात. दरवर्षी जून महिन्यात पौर्णिमेनंतर गावकरी एकत्र येऊन ‘परू’ (सामूहिक महाप्रसाद) करतात. यात सर्वजण एकत्र मिळूनमिसळून स्वयंपाक करतात. तसेच, श्रावण महिन्यात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रोज एक महापूजा केली जाते. पंचेचाळीस कुटुंबांनी ही महापूजेची परंपरा गेल्या २२ वर्षांपासून आजतागायत अखंडपणे जपली आहे. धनेगाव बॅरेजच्या पाण्यामुळे मूळ साळुंका कायमस्वरूपी पाण्याखाली गेली असती. त्यावर तोडगा म्हणून नदीपात्रातच कुडलसंगमच्या धर्तीवर दोन फुटांच्या पिंडीभोवती गोल मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरावर कळस किंवा इतर कोणतेही छत नाही. विशेष म्हणजे, मांजरा नदीला कितीही मोठा पूर आला तरी साळुंका आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहते. निसर्गाच्या सान्निध्यात नदीपात्रातच पूजाअर्चा करण्याचा हा अनुभव मिळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *