Headlines

वणीत गढूळ पाणी, गॅस वितरण, वाईन शॉप स्थलांतरावर नागरिक आक्रमक:प्रलंबित प्रश्नांवर त्वरित ठोस कार्यवाही करण्याची नागरिकांची मागणी‎




येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील अनियमित व गढूळ पाणीपुरवठा, घरगुती गॅस वितरणातील गैरसोय, दामोदरनगर येथील वाईन शॉपचे कथित परवानगीविना स्थलांतर तसेच विकासकामांच्या वृत्तांकनाचा मुद्दा ग्रामसभेत गाजला. नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली. ग्रामसभेला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न ग्रामसभेत ऐरणीवर आला. पिण्याचे पाणी गढूळ व उग्र वासाचे येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली. पाणीपुरवठा नियमित व स्वच्छ करण्याबाबत महिलांनी प्रशासनाला जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. दामोदरनगर परिसरातील वाईन शॉपच्या स्थलांतराचा प्रश्नही ग्रामसभेत गाजला. ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेता संबंधित दुकान शेजारील दुसऱ्या गाळ्यात स्थलांतरित करण्यात आल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित प्रकरणाची पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.यावेळी गणेश देशमुख, पूनम थोरात आणि सतीश जाधव यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले. ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे यांनीही महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्याची मागणी केली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह किरण गांगुर्डे, राकेश थोरात, महेंद्र पारख आदी उपस्थित होते. घरगुती गॅस वितरणातील अडचणींबाबतही नागरिकांनी तक्रारी मांडल्या. ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची केवळ नोंद घेऊन विषय प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यावर वेळेत आणि ठोस कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आगामी काळात नागरिकांना अधिक तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *