Headlines

शिवसेना शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांना भेट:सण-उत्सवांवरील ध्वनिक्षेपक निर्बंधांवर व्यवहार्य धोरणाची मागणी




शिवसेना शिष्टमंडळाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. आगामी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य धार्मिक सणांसाठी ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत व्यवहार्य धोरण आखण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागपंचमी उत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत अचानक कठोर निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे मध्यवर्ती पुण्यातील पारंपरिक उत्सव मंडळांमध्ये नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन सादर केले. ध्वनिप्रदूषणाचा अतिरेक किंवा नागरिकांना त्रासदायक ठरणारा आवाज याला शिवसेना समर्थन देत नाही. मात्र, सरसकट बंदी किंवा अत्यंत कडक निर्बंध योग्य नसल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. कायद्याचा सन्मान राखतानाच सण-उत्सवांची परंपरा आणि उत्साह कायम राहावा, अशी त्यांची भूमिका होती. गणेशोत्सवामुळे पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली आहे. हजारो मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवांची तयारी करतात, ज्यामुळे विविध घटकांना रोजगार आणि आर्थिक आधार मिळतो. प्रशासनाने ध्वनिप्रदूषणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिणामांचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, “तुमच्या भावनांची कदर आहे, मात्र पुण्यात सध्या ध्वनिवर्धकांचा उन्माद सुरू आहे, तो थांबवणे आवश्यक आहे.” त्यांनी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संबंधित घटकांची बैठक घेऊन सामोपचाराने व्यवहार्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. “कायद्याचा मानसन्मान राखलाच पाहिजे, पण धर्म, सण-उत्सव आणि संस्कृतीही टिकली पाहिजे. निर्बंध असावेत, पण ते व्यवहार्य असावेत,” अशी भूमिका शिवसेनेने पुन्हा मांडली. या शिष्टमंडळात सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, युवासेना शहराध्यक्ष युवराज पारिख यांच्यासह राजेंद्र शिंदे, अनंत घरत, चंदन साळुंके, मकरंद पेठकर, परेश खांडके, प्रतीक आल्हाट, सुनील गायकवाड, अमर काची आणि शिवाजी मेलकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *