Headlines

महापालिकेची कारवाई:देवळाईत 40 एकरांवरील अनधिकृत प्लॉटिंग उद्ध्वस्त; डेव्हलपर्सचे कार्यालय पाडले, पाच वर्षांपासून सुरू होती प्लॉटिंग; 450 प्लॉटचे मार्किंग उखडले




सोलापूर-धुळे महामार्गावरील देवळाई (सातारा परिसर) येथे 35 ते 40 एकर जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत ले-आऊट मनपाने बुधवारी (19 ऑगस्ट) उद्ध्वस्त केले. जयशंकर डेव्हलपर्सने कोणतीही एनए किंवा अधिकृत परवानगी नसताना येथे श्री साईनगर नावाने बेकायदा प्लॉट पाडले होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाने महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये कारवाई करत येथील 450 प्लॉटच्या मार्किंग, विकासकाचे अनधिकृत कार्यालय आणि 5 पक्की बांधकामे पाडून टाकली आहेत. कोणत्याही सोयी-सुविधा किंवा अधिकृत मंजुरी नसताना स्वस्तात प्लॉटचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या ठिकाणी सुरू होती. या ठिकाणी मागील काही वर्षांपासून हप्त्यावर प्लॉट देणे सुरू होते. या ठिकाणी 350 पेक्षा अधिक नागरिकांनी हप्त्यावर प्लॉटदेखील खरेदी केले आहेत. या प्रकरणी विक्री करणाऱ्या शेख मोईन आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. भूमाफियांनी वन विभागाच्या अखत्यारीतील जागेवरही अतिक्रमण करून तेथे ले-आऊट पाडल्याचे समोर आले आहे. मनपाचे अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी संबंधित प्लॉटिंगधारकांना नोटीस बजावत परवानगीबाबत विचारणा केली होती. मात्र, प्लॉटधारकांकडे कसलाही कायदेशीर पुरावा किंवा अधिकृत मंजुरी नसल्याने बुधवारी थेट मनपाचा जेसीबी या बेकायदा साम्राज्यावर पडला. 350 पेक्षा अधिक नागरिकांनी हप्त्यावर केले होते प्लॉट खरेदी महानगरपालिकेच्या पथकाने देवळाई परिसरातील अनधिकृत प्लॉटवर कारवाई केली. या वेळी डेव्हलपर्सने नागरिकांकडून वसूल हप्त्यांची पावती जप्त केली. अनधिकृत वसाहतीला मनपाकडून ड्रेनेज अन् रस्तेही मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी प्लॉटिंग सुरू होती. मात्र मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना या अनधिकृत प्लॉटिंगबाबत दिसले नाही. विशेष म्हणजे निसर्गरम्य परिसरात ही प्लॉटिंग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटला मागणी होती. 600 चौरस फुटांचा प्लॉट 8 ते 10 लाख रुपयांना विक्री होत होता. अनधिकृत प्लॉटिंग असताना या ठिकाणी मनपाच्या आशीर्वादाने ड्रेनेजलाइन आणि रस्त्याचीदेखील सोय करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यामध्ये मनपाच्या कोणत्या अधिकाऱ्यांचा हात आहे हे शोधणेदेखील महत्त्वाचे आहे. फसवणूक करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल केले जाणार काही भूमाफियांकडून अनधिकृत प्लॉटची विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार गोपनीय सूत्रांनी सांगितला होता. महापौर आणि आयुक्त यांच्या आदेशाने सुमारे 40 एकरांवरील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा अनधिकृत प्लॉटिंगबाबत माहिती असल्यास नागरिकांनी कळवावे. त्यांचे नाव गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येईल. -संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग, महानगरपालिका.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *