![]()
धनगर समाजाने आपली ताकद दाखवल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. धनगर समाज महाराष्ट्रभर एकत्र आला तर आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस सुद्धा लागणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तथा धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त, नवनियुक्त तसेच पदोन्नती प्राप्त समाज बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचाही गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रा. अंजली आंबेडकर बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, अकोला धनगर समाज व अधिकारी- कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी िज. प. चे माजी गट नेते ज्ञानेश्वर सुलताने होते. उद्घाटक धनगर आरक्षण संघर्ष योद्धे दीपक बोराळे होते. मार्गदर्शिका म्हणून वंचित बहुजन आघाडी प्रा. अंजली आंबेडकर होत्या. प्रमुख अतिथी राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे, गोपाल कोल्हे, साहेबराव पातोंड, सारंगधर नवलकर, बळीराम चिकटे, सुमन गावंडे, श्याम किसन घोंगे, योगीता रोकडे, शिवाजीराव काळे, पुष्पा गुलवाडे आदी उपस्थित होते. बळीराम चिकटे, गोपाल कोल्हे, चंद्रशेखर सोनवणे, सारंगधर नवलकार यांनी संबोधित केले. ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले की, जिल्ह्यात धनगर समाज एकजुटीने कार्य करत असून त्याचाच परिपाक जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांमध्ये धनगर समाजाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होता आले. समाज एकत्र राहिला तर यापुढे सुद्धा समाजाचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाच्या पदावर दिसतील असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन शंकरराव भदे यांनी केले. आभार मनोहर बाहे यांनी मानले. अहिल्यादेवी यांच्या कार्यावर मंथन : प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, धनगर समाजाने एकजूट होऊन आपली ताकद दाखवून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे. समाजाने आपली ताकद दाखवल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. अहिल्यादेवींनी केलेल्या समाजोपयोगी कार्याविषयी माहिती देऊन धनगर समाजाने एकत्र येऊन आपल्या आरक्षण न्याय मागणीसाठी राजकीय दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. धनगर समाज मोठ्या संख्येने असून, तो विखुरला असल्यामुळे समाजाला राजकीय राज्यकर्ते आरक्षण देण्यास टाळाटाळ करतात. त्यासाठी आपण सर्व समाजाने एकत्र येऊन लढले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी अहिल्याच्या लेकी कर्तृत्ववान महिला म्हणून सुमन गावंडे, पुष्पा गुलवाडे, ॲड. मंदा कायंगे, रेखा डांगे, जयश्री नवलकर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात दहावी, बारावी, नीट, जेईई, एमडी, एमबीबीएस, बीटेक, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. समाज सुरक्षा समिती स्थापन प्रास्ताविकामध्ये साहेबराव पातोंड यांनी धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवावर व गोरगरीब समाज बांधवांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा पाढा वाचला. यावेळी धनगर समाजाने संकटकाळी समाज बांधवांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बळ देण्यासाठी जिल्हास्तरावर धनगर समाज सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हा धनगर समाज सुरक्षा समितीची घोषणा करून समितीच्या फलकाचे अनावरण दीपक बोराडे व अंजली ते आंबेडकर यांचे हस्ते करण्यात आले.
Source link
धनगर समाजाने आरक्षणासाठी लढा द्यावा- प्रा. अंजली आंबेडकर:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, समाजातील गुणवंतांचा गुणगौरव