Headlines

संभाजीनगरात तलाठी नियुक्तीची बोगस ऑर्डर देत 42 लाखांचा गंडा:उमेदवारांना चक्क ट्रेनिंगही दिले, दोघांविरोधात गुन्हा दाखल




निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून बनावट ओळखपत्रे, टॅब, तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्रांआधारे तलाठी पदावर नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयीन अभिलेखांशी पडताळणी केली असता नियुक्ती आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांची बनावट सही असल्याचे निष्पन्न झाले. असे उकळले ४१.५० लाख या प्रकरणात अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड यांनी अर्ज दिला होता. त्यानुसार, त्यांच्या पत्नी अश्विनी तुपे (माहेरचे नाव) आणि अक्षय साईनाथ गायकवाड (रा. एन-२, सिडको) यांचा भाऊ स्वप्निल गायकवाड यांना तलाठीपदी नियुक्तीचे आदेश १० ऑगस्ट २०२६ रोजी rdcchsngr@gmail.com या बनावट ई-मेलवरून पाठविण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पडताळणीत ही बनावटगिरी उघड झाली. अजिनाथ यांच्या पत्नीच्या नियुक्तीसाठी १३.५० लाख रुपये, तर अक्षय यांच्या भावाच्या नियुक्तीसाठी २८ लाख रुपये घेण्यात आले. यातील काही रक्कम आरटीजीएस/यूपीआय, तर उर्वरित रोख देण्यात आली. दोन्ही व्यवहारांतून एकूण ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी अनिल भगत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आणखीही काहीजणांना बोगस नियुक्ती दिल्याचे वरकड यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत. पुणे, कोल्हापूरहून बोलावले प्रशिक्षक उमेदवारांचा नियुक्तीवर विश्वास बसावा यासाठी २४ फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह, तहसील कार्यालय व पंचायत समितीत आठवड्यातून ३ दिवस त्यांना चक्क प्रशिक्षण देण्यात आले. ‘पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत आहेत,’ असे त्यांना सांगण्यात आले. तलाठी म्हणून त्यांना बनावट ओळखपत्रे आणि टॅबही देण्यात आले. महसूलच्या संगणकीय कामकाजासाठी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या बनावट सहीची पत्रेही त्यांना दिली होती. फसवणूक झालेल्यांनी तक्रार द्यावी पोलिस चौकशी सुरू आहे. अजून कुणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार द्यावी. – जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *