![]()
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव (पारनेर) शिवारात गुरुवारी (२०) सकाळी सहाच्या सुमारास दोन ट्रक उलटल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही दिशांनी तब्बल साडेसहा तास ठप्प झाली. मात्र, सुपे पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्याने मोठ्या प्रमाणावर होणारा वाहतूक खोळंबा टळला. दुपारी साडेबारा वाजता अपघातग्रस्त ट्रक हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारा ट्रक अचानक उलटला. त्याची धडक पुण्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकला बसल्याने तोही नियंत्रण सुटून रस्त्यावर आडवा झाला. त्यामुळे एक ट्रक अहिल्यानगरकडे जाणाऱ्या मार्गावर, तर दुसरा पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पडल्याने दोन्ही दिशांचे मार्ग बंद झाले. अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. पुण्याकडे जाणारी वाहने सुपे-पारनेर-राळेग सिद्धी-वाडेगव्हाण मार्गे, तर अहिल्यानगरकडे जाणारी वाहने वाडेगव्हाण-राळेगण िद्धी-पारनेर-सुपे मार्गे वळविण्यात आली. दरम्यान, ट्रक हटविण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. मात्र, वाहनांची गर्दी आणि घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास लागलेला वेळ यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास विलंब झाला. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पारनेर शहरासह सुपा रस्त्यावर वाहतूक कोंडी पारनेर-सुपे रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. परिणामी पारनेर शहरासह सुपे रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
Source link
2 ट्रक उलटले; नगर-पुणे मार्ग साडेसहा तास ठप्प:सुपे पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून मोठी कोंडी टाळली