Headlines

मातीच्या गणपतीसाठी 'माझा बाप्पा मातीचा' पोर्टल:नागपूरसह विदर्भातील भक्तांना एका क्लिकवर मूर्ती खरेदीची सुविधा




नागपूरसह विदर्भातील गणेशभक्तांसाठी ‘माझा बाप्पा मातीचा’ हे विशेष डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पारंपरिक मूर्तीकार व हस्तकला कारागीर संघातर्फे हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मातीच्या मूर्ती शोधण्याची कसरत संपणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या हस्ते मनपा कार्यालयात या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नैसर्गिक जलाशयांमध्ये पीओपी मूर्ती विसर्जनावर बंदी आहे. असे असतानाही, बाजारात अजूनही पीओपीच्या मूर्तींची मोठी दुकाने सजलेली दिसतात. या संभ्रमावस्थेत गणेशभक्तांना मातीच्या मूर्ती, दुकाने आणि कार्यशाळा शोधणे कठीण होत होते. गणेशभक्तांची हीच समस्या दूर करण्यासाठी संघाने http://pmhks.org ही वेबसाईट किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून ‘माझा बाप्पा मातीचा’ हे डिजिटल पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना आपल्या परिसरातील अधिकृत मातीच्या मूर्तीकारांची आणि विक्रेत्यांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. या पोर्टलवर मूर्तींचे प्रकार, छायाचित्रे, व्हिडिओ, संपर्क क्रमांक तसेच कार्यशाळेचा गुगल मॅप समाविष्ट करण्यात आला आहे. ही वेबसाईट फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपशी जोडलेली असल्यामुळे ग्राहक व मूर्तीकार यांच्यात थेट संवाद साधणे अत्यंत सुलभ झाले आहे. प्रदेश अध्यक्ष सुरेश पाठक यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या जवळच्या परिसरातील अधिकृत मातीच्या मूर्ती विक्रेत्यांकडून मूर्ती खरेदी करून यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक साजरा करावा. या लोकार्पण सोहळ्यास चंदनलाल प्रजापती, महेश ठाकरे, राजाभाऊ रेवडकर, गजानन बुरबादे, प्रभाकर वालदे, गोविंदा कपाट, प्रवीण गाते, जाणबा कपाट, मनोज वरवाडे, गणेश वालदे, धनराज वझे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *