![]()
नागपुरात प्रेमसंबंध आणि जुन्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरेंद्रनगर पूल आणि सुंदरबन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अजनी आणि बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मयत गुंडाचे नाव गौरव पंकज रगडे (वय २५) असून, तो ‘गमछू’ हत्याकांडासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव रगडेचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रगडे कारागृहात असताना आरोपी गौरव राऊतची त्याच तरुणीसोबत जवळीक वाढली. दोघांनी मिळून ‘क्लाऊड किचन’ नावाचा व्यवसायही सुरू केला होता. रगडे जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला या भेटीगाठींची माहिती मिळाली, ज्यामुळे तो प्रचंड संतापला होता. गुरुवारी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत आणि संतापलेल्या गौरव रगडेने आरोपी गौरव राऊतच्या खोलीवर जाऊन शिवीगाळ केली आणि सामानाची नासधूस केली. त्यानंतर राऊतने तिथून पळ काढला असता, रगडेने त्याचा पाठलाग केला. सुंदरबन आणि नरेंद्रनगर पुलाजवळ दोन्ही गटांमध्ये झटापट झाली. या हाणामारीत आरोपींनी रगडेवर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रगडेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी आणि अजनी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. हत्येनंतर पसार होणाऱ्या मुख्य आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Source link
नागपुरात कुख्यात गुंडाची प्रेम प्रकरणातून हत्या:जुन्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक