![]()
खुलताबाद शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. विशेष पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईत १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बसस्थानक परिसरातील एका शटरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या वेळी (एमएच २० डीसी ०८४६) क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रिक मोटार व वजन काटा वापरून घरगुती सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्याचे आढळले. कारवाईदरम्यान पोलिसांनी एचपी कंपनीचे ९ आणि भारत गॅसचे ४ असे एकूण १३ घरगुती गॅस सिलिंडर भरलेले व रिकामे, १ लाख ५० हजार रुपये किमतीची ऑटोरिक्षा, इलेक्ट्रिक मोटार पंप, वजन काटा आणि गॅस नळ्या जप्त केल्या. विनापरवाना घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून वाहनात गॅस भरणे हा अत्यंत धोकादायक प्रकार असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या प्रकरणी अंमलदार योगेश क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून संशयित शेख रऊफ आणि संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
खुलताबादला अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश:जुन्या बसस्थानक परिसरात कारवाई: 1 लाख 84 हजारांचा मुद्देमाल केला जप्त