![]()
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. आकाश दत्ता जाधव (वय ३६) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने रेस्टॉरंट अँड बारसाठी आवश्यक असलेल्या ‘एफएल-३’ परवान्यासाठी ही लाच मागितली होती. तक्रारदाराने आपल्या रेस्टॉरंट अँड बारच्या ‘एफएल-३’ परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यासंबंधीची कागदपत्रे अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयात सादर केल्यानंतर, दुय्यम निरीक्षक आकाश जाधव याने तक्रारदाराकडे एकूण आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये स्वतःसाठी तीन लाख आणि वरिष्ठांसाठी पाच लाख रुपये अशी मागणी होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथील एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे २४ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती, आरोपी आकाश जाधव याने स्वतःसाठी अडीच लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार, अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयातील त्याच्याच कक्षात सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशन, अमरावती येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक राजकिरण येवले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Source link
अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक जाळ्यात:रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-3 परवान्यासाठी केली होती मागणी