Headlines

हिंजवडीत प्रलंबित मागण्यांसाठी आयटी कंपन्यांचे आंदोलन:रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधांसाठी 6 सप्टेंबर रोजी निदर्शने




हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटी कंपन्या आणि कर्मचारी संघटनांनी 6 सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारले आहे. हिंजवडी मुख्य चौक ते शिवाजी चौक दरम्यान सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून या आयटी क्षेत्रात पायाभूत सुविधांची प्रतीक्षा असून, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या, मात्र हिंजवडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असोसिएशनचे पवनजीत माने यांनी सांगितले की, हिंजवडी आयटी क्षेत्रात दूरदूरवरून कर्मचारी येतात, परंतु येथील रस्ते खराब असल्याने समस्या वाढल्या आहेत. यामुळे कामावर आणि आरोग्यावर परिणाम होत असून, अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. हिंजवडी येथील रहिवासी प्रशांत भोपळे यांनी खंत व्यक्त केली की, अरुंद रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडी ही दैनंदिन समस्या बनली आहे. लहान मुलांसाठी रस्ते धोकादायक झाले असून, पायाभूत सुविधांसाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलकांनी रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मेट्रो तातडीने सुरू करून वाकड-बालेवाडी ट्रान्झिट हब विकसित करण्याची मागणी केली आहे. राधिका जोगे यांनी सांगितले की, विकास झाला असला तरी रस्ते, पाणी आणि वाहतूक या मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. नम्रता नाईक यांनी खड्डे, अपघात आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. या ठिकाणच्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांबाबत तातडीने आराखडा तयार करावा, असेही यावेळी सूचित करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक शेतकरी, रहिवासी, आयटी कर्मचारी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, माण-हिंजवडी-मारुंजी इन्फ्रा फोरम, एफआयटीई, पिंपरी चिंचवड को-ऑप हौसिंग फेडरेशन, मुळशी हौसिंग को-ऑप हौसिंग फेडरेशन आणि इतर स्थानिक संघटना सहभागी होणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *