![]()
राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले असून आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात ता. १ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आंदोलन केले जाणार असून यामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी ता. २६ पत्रकारांशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर प्रा. हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षण समितीचे जिल्हा समन्वयक ॲड. रवी शिंदे, दिनकर कोकरे, एकनाथ कुटे, विलास आघाव, वैजनाथ पावडे, डॉ. नागोराव जांबूतकर, अशोक श्रीरामे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना प्रा. हाके म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान व्हि. पी. सिंग यांनी लागु केलेल्या मंडल आयोगामुळे ओबीसींच्या आयुष्यात नवीन पर्व आले होते. मात्र मागील तीन ते चार वर्षात राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असून स्वातंत्र्यांच्या लढ्या प्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या हक्काचा लढा उभा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात सध्या सत्ताधारी, विरोधक देखील ओबीसींच्या बाजूने बोलण्यास तयार नाहीत. ओबीसींचे आरक्षण संपलेले आहे, मात्र काही जण ओबीसी आरक्षण संपलेले नाही असे सांगत आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण कसे संपले नाही हे दाखवून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. देशात एकीकडे आदिवासी समाजाला राष्ट्रपतीपद देता अन दुसरीकडे आदिवासी तरुणांना विद्यार्थ्यांना १३ दिवस उपोषण करायला लावताय हे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाणारी गोष्ट आहे. समाज कल्याण खात्याचा निधी इतरत्र वळविला जातो याकडे समाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार प्रसाद लाड, बबनराव तायवाडे यांच्यावरही टिका केली. राज्यातील ओबीसी आमदार निवडणुक येणार नाही, त्यांचे राजकारण संपवू असे काही जण बोलत आहेत, मात्र आता आम्ही ओबीसी बांधव यापुढे कोणाला निवडून आणायचे, कोणाला पाडायचे हे ठरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलन केल जाईल. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीचे अर्ज मुंबई पोलिस विभागाला दिले आहेत. ता. १ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यातील पारस टोलनाका येथून हजारो ओबीसी बांधव मुंबईच्या दिशेने कुच करणार असल्याचे प्रा. हाके यांनी सांगितले.
Source link
ओबीसी आरक्षण संपविणाऱ्यांच्या विरोधात आमचे आंदोलन:स्वातंत्र्यांच्या लढ्या प्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या हक्काचा लढा उभा करणार- लक्ष्मण हाके