![]()
58 लाख कुणबी नोंदींचा प्रश्न निकाली काढून प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. मागण्या अमान्य झाल्यास मुंबईत आंदोलन करू आणि आझाद मैदानावरील निर्बंध मानणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने साधलेला हा संवाद… प्रमुख मागण्या कोणत्या? जरांगे : 58 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे द्या. दिलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करा. अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्रे द्या. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, पण प्रमाणपत्रे व पडताळणीचे काय? सातारा, कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी आणि ‘सारथी’सह सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही. नोंदींमध्ये विसंगती का आहे? जरांगे :जुन्याच नोंदी आंदोलनादरम्यान शोधल्या, त्याचे प्रोसिडिंग आहे. पण 3 कोटी मराठे आरक्षणात येऊ नयेत म्हणून सरकार नोंदी कमी करत आहे. फडणवीस जाणीवपूर्वक हे करत आहेत. यात शिंदेंना डॅमेज करण्याचा डाव असू शकतो किंवा शिंदेंनीच समाजाला वेड्यात काढले असावे. सामंत व देसाई 58 लाख नोंदी मान्य करतात, मग विखे-फडणवीसांनाच त्या कमी का करायच्यात? हे षड््यंत्र असू शकते. उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांवर नाराजी का? जरांगे :विखे पाटील समितीच्या कामाबाबत गंभीर नाहीत. त्यांना प्रमाणपत्रांचा अचूक आकडाही माहिती नाही. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याबाबत आणि थांबलेल्या पडताळणीबाबत ते ठामपणे विचारणा करत नाहीत. ओबीसींच्या धर्तीवर दिलेल्या सवलतींच्या जीआरचाही उपयोग नाही. ते केवळ आमचे उपोषण सोडवायला किंवा पुढे ढकलायला येतात. किती दिवस उपोषणाची तयारी आहे? जरांगे :समाजाच्या वेदनांपुढे माझ्या वेदना क्षुल्लक आहेत. शेतमालाला भाव नाही, मुलांना नोकरी-शिक्षण नाही. त्यामुळे प्रकृतीची पर्वा न करता उपोषण करणार. मुंबईकडे कधी निघणार? जरांगे : हे 29 ऑगस्टला जाहीर करू. समाजाने एकाच दिवशी आंतरवालीत न येता टप्प्याटप्प्याने यावे, असे आवाहन आहे. आझाद मैदान सायंकाळी 6 पूर्वी खाली करण्याच्या नियमावर काय सांगाल? जरांगे : मी मैदान सोडणार नाही. आम्ही निर्बंध जुमानणार नाही. जिथे जागा मिळेल तिथे अन्न शिजवून झोपू. परवानगी मागून आम्ही कायद्याचा मान राखला. वेळ पडल्यास मी ‘वर्षा’ बंगल्याच्या छतावर बसेन. म्हणजे तुम्ही ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करणार? जरांगे :‘वर्षा’, मुंबई आणि महाराष्ट्र आपलाच आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्क किंवा ‘वर्षा’वरही आंदोलन करू. फडणवीस आमचेच असल्याने ते येऊ नका म्हणणार नाहीत. अडचण असल्यास आम्ही बंगल्याच्या टेरेसवर बसू. समाजाचा हाच पाठिंबा कायम ठेवण्यासाठी रणनीती काय? जरांगे :हे निर्णायक आंदोलन असून यानंतर आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही. सर्व मागण्या मान्य करूनच घेऊ. समाजाचे नुकसान करणाऱ्या बावनकुळे किंवा शिरसाट यांना सोडणार नाही. शिंदे व फडणवीस यांनीच त्यांना पुढे करून मराठ्यांचे वाटोळे केले.
Source link
दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न- आझाद मैदानावर निर्बंध लावले आहेत, मुंबईत आंदोलन कसे होणार? जरांगे- निर्बंध आम्ही मानत नाही, वेळप्रसंगी ‘वर्षा’ बंगल्याच्या छतावरही बसू