![]()
कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरडा ट्रकची सभासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तारीख 19 पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर डोंगरगाव पूल जवळ पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहने एकाच मार्गावरून धावतात. दरम्यान आज पहाटे हिंगोली कडून एक ट्रक ( RJ 09 GC 0967 ) नांदेड कडे जात होता. सदर ट्रक कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारात आला असताना नांदेड कडून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. सदर अपघातामध्ये चालक आशीम सलीम घाची (वय 30वर्षे रा.अरवली जिल्हा गुजरात) जागीच ठार झाला. तर तुफान गवारवाल राठोड (वय 35 वर्षे रा.रावनखेडी ता.झालडा जिल्हा उज्जैन), बाबुलाल ज्ञानुराम मकवाना (वय 40वर्षे रा. धाबलाहारदू ता.तुशना जिल्हा उज्जैन), हफीज आझम मुलतानी (वय 35 वर्षे रा.मुदुसा अरवली गुजरात) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ अनमोड,जमादार सोपान थिटे, गजानन कोरडे, प्रवीण राठोड पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील जखमींना तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. या घटनेची आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.
Source link
कळमनुरी-आखाडा बाळापूर मार्गावर दोन ट्रकची भीषण धडक:एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर