![]()
नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाच्या वतीने श्री मार्कंडेय रथोत्सव पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी मैदान येथील ऐतिहासिक श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर ‘मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात’ शोभायात्रेला प्रारंभ झाला. सजवलेल्या रथात मार्कंडेय महामुनींची पालखी तसेच महादेवाच्या पिंडीला कवटाळून बसलेल्या मार्कंडेय महामुनींची मूर्ती ठेवण्यात आली होती. पद्मशाली समाजाच्या पारंपरिक कापड विणण्याच्या व्यवसायाचे प्रतीक असलेले हातमाग यंत्रही मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शोभायात्रेत पद्मशाली समाजाचे पारंपरिक कोलावू नृत्य, महिलांचे फुगडी पथक, मार्कंडेय विद्यालयाचे टिपरी व लेझीम पथक, लाठी-काठी पथक तसेच तालयोगी ढोल-ताशा ध्वज पथक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिकांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांसाठी विविध ठिकाणी महाप्रसाद, अल्पोपहार, पाणी व सरबताची व्यवस्था करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी मार्कंडेय रथोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून पद्मशाली समाज ही परंपरा उत्साहाने जपत असल्याचे सांगितले. या सोहळ्यामुळे नव्या पिढीला समाजाच्या संस्कृतीचा वारसा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम यांनी मंदिराला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा असून हा वारसा जपत दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते, असे सांगितले. अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, पंच कमिटी अध्यक्ष संजय वल्लाकट्टी व आदींनी सोहळ्याचे नियोजन केले.
Source link
मार्कंडेय रथोत्सवाने अहिल्यानगर शहर दुमदुमले:पद्मशाली संस्कृतीचा जागर; शोभायात्रेत कोलावू, फुगडी, लेझीम, टिपरी अन् मल्लखांबाची प्रात्यक्षिके