![]()
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा शिवारात वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १९ सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो अन लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करांमधून खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जंगलामधून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, विश्वनाथ टाक, माधव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून पहाटे, दुपारी तसेच रात्रीच्या वेळी जंगल परिसरात गस्त घातली जात आहे. दरम्यान, आज दुपारी उमरा फाटा शिवारातून एका टेम्पोमध्ये सागवान लाकुड भरून वसमतकडे नेला जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल काळे, वनरक्षक अशोक चव्हाण यांच्यासह पथकाने वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी एक टेम्पो उमराफाटा शिवारातून वसमतकडे जात असतांना वन विभागाच्या पथकाने टेम्पो चालकास थांबण्याची सूचना केली. त्यानंतर चालकाची चौकशी सुरु केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. याप्रकारामुळे वन विभागाच्या पथकाने टेम्पोची तपासणी केली असता त्यात सागवून लाकूड भरलेले दिसून आले. सदर सागवानाचा वाहतुकीचा तसेच तोडणीचा परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने टेम्पो व लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाकडून पुढील कारवाई केली जात आहे.
Source link
हिंगोलीत वन विभागाची धडक कारवाई:विनापरवाना सागवान लाकडासह टेम्पो जप्त, उमरा फाटा शिवारात तस्करांचा डाव उधळला