![]()
वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला चाललेल्या नऊ वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (30 ऑगस्ट ) दुपारी घडली. मेहबूब स्टुडिओ परिसरातील जॉन बॅप्टिस्ट रोडवर झालेल्या या भीषण अपघातात अंश रवींद्र गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी इनोव्हा कारचालक मेघना रावल (45) हिला अटक केली आहे. रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. मेहबूब स्टुडिओसमोरील जिजामाता उद्यानाच्या परिसरातून अंश जात होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने त्याला धडक दिली. धडकेनंतर कारचे चाक अंशच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अंशला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. नेमकं काय आहे प्रकरण या घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा थरारक अनुभव सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार, तो घटनास्थळाजवळ जेवण घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक अपघात झाल्यासारखा मोठा आवाज त्याला ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिले असता इनोव्हा कारचे पुढील चाक मुलाच्या अंगावर असल्याचे दिसले. त्यानंतर कारचे दुसरे चाकही मुलाच्या अंगावरून गेल्याचे त्याने सांगितले. हे दृश्य पाहताच प्रत्यक्षदर्शीने धावत जाऊन कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो अंशजवळ गेला. त्यावेळी मुलाची अवस्था अत्यंत गंभीर होती. परिसरातील नागरिकांच्या मदतीने अंशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, अंश रस्ता ओलांडत नव्हता. तो रस्त्याच्या कडेला जात होता. असे असतानाही कार त्याच्यावर गेल्याचा दावा त्याने केला आहे. ‘महिला चालक फोनवर बोलत होती’, प्रत्यक्षदर्शीचा दावा अपघातावेळी इनोव्हा कार एक महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही महिला कार चालवताना मोबाईल फोनवर बोलत असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. त्यामुळे तिचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कारचालक महिलेचे लक्ष नेमके कशामुळे विचलित झाले आणि अपघात कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अंशला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले अपघातानंतर अंश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीवरून कारचे चाक गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. नागरिकांनी आणि संबंधितांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर अंशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. चिमुरड्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच गुप्ता कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. काही वेळापूर्वी घराबाहेर गेलेला आपला मुलगा पुन्हा कधीच परतणार नाही, या विचाराने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातानंतर मेहबूब स्टुडिओ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अंशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. महिला चालकाला अटक घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालक मेघना रावल हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आता या अपघाताचा सविस्तर तपास केला जात आहे. कारचा वेग किती होता, चालकाचे लक्ष विचलित झाले होते का, अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती आणि प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास केला जात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबईतील रस्त्यांवरील वेगवान वाहनांचा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका चिमुरड्याचा जीव गेल्याने गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली.सविस्तर वाचा..
Source link
मुंबईत भरधाव कारने 9 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडलं:वांद्रेपरिसरात भीषण अपघात, महिला चालकाला अटक