![]()
लासूर स्टेशन आगामी गणेशोत्सव व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर लासूर स्टेशन येथील जैन मंगल कार्यालयात व्यापारी, पोलिस पाटील, ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त शांतता समिती बैठक पार पडली. गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि उत्सव पूर्णपणे डीजेमुक्त व शांततेत साजरा करावा, असे आवाहन डॉ. निलेश पालवे यांनी केले. परिसरात कोणतीही संशयित व्यक्ती, वस्तू किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास तात्काळ शिल्लेगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांची मुंबई येथे बदली झाल्याबद्दल व्यापारी, मेडिकल असोसिएशन व पत्रकारांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सेवाकाळात पत्रकारांचे सहकार्य लाभल्याचे सांगत, भविष्यातही सहकार्याचे नाते कायम राहील, असा विश्वास डॉ. पालवे यांनी व्यक्त केला. शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डीवायएसपी पालवे. व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी व्यापाऱ्यांना आपल्या आस्थापनांसमोर सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले. तसेच गावोगावी सुरक्षा साहित्य पुरवून ‘ग्रामसंरक्षक दल’ स्थापन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी मानले. या प्रसंगी बीट अंमलदार धनंजय गोंडे, अर्जुन तायडे, विनोद बिघोत, योगेश हरणे, पोलिस कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लासूरला शांतता समिती बैठक