![]()
यंदाच्या संपूर्ण स्थलांतरित पक्षी हंगामात जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात एकही फ्लेमिंगो दिसून आला नसताना सप्टेंबरच्या प्रारंभी अचानक फ्लेमिंगोंचे दर्शन झाल्याने पक्षिप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणतः मे महिन्यात फ्लेमिंगोंचा परतीचा हंगाम संपतो. त्यानंतर हे पक्षी आपल्या मूळ अधिवासाकडे परततात. सध्या त्यांच्या विणीचा काळ सुरू असताना जायकवाडीवर त्यांचे आगमन होणे हा पक्ष्यांच्या बदलत्या वर्तनाचा संकेत मानला जात असल्याचे पक्षिमित्र प्रा.संतोष गव्हाणे यांनी सांगितले. यंदा नवी मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रमी संख्येने फ्लेमिंगो आढळून आले होते. त्यामुळे जायकवाडी परिसरातही त्यांच्या आगमनाची अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण हंगाम उलटून गेल्यानंतरही फ्लेमिंगोंचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे सप्टेंबर सुरू होताच जायकवाडी जलाशयावर त्यांची झालेली उपस्थिती विशेष ठरत आहे. जायकवाडी अभयारण्य हे विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास क्षेत्र मानले जाते. त्यामुळे नेहमीच्या स्थलांतर कालावधीपेक्षा वेगळ्या वेळी फ्लेमिंगो येथे आढळणे ही केवळ पक्षिप्रेमींसाठी आनंदाची बाब नसून पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाची नोंद आहे. हवामान बदल, जलाशयातील पाण्याची उपलब्धता, खाद्याची निर्मिती आणि अधिवासातील बदल यांचा स्थलांतरित पक्ष्यांच्या वर्तनावर नेमका काय परिणाम होत आहे, याचा दीर्घकालीन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे यासाठी सरकारने लक्ष देण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक यांनी केली आहे आहे. हवामानात बदल झाल्याचा परिणाम फ्लेमिंगो हे पाणथळ अधिवास, खाद्याची उपलब्धता आणि पाण्याची पातळी यानुसार स्थलांतराचा मार्ग व मुक्कामाचे ठिकाण बदलू शकतात. जायकवाडी जलाशयातील यंदाची पाण्याची स्थिती, बदललेली पाणथळ क्षेत्रे, खाद्यसाखळीतील बदल तसेच हवामानातील चढ-उतार यांचा त्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रीय अभ्यासाची गरज असल्याचे पक्षीमित्र गव्हाणे यांनी सांगितले. अभ्यास होणे आवश्यक सप्टेंबरमध्ये फ्लेमिंगोंचे हे अनपेक्षित आगमन भविष्यात त्यांच्या स्थलांतराच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांची नांदी ठरणारी आहे, जायकवाडी पक्षी अभयारण्यातीतल पक्षाच्या वर अभ्यास होणे आवश्यक आहे. -प्रा. संतोष गव्हाणे, पक्षी अभ्यासक पैठण
Source link
जायकवाडी अभयारण्य परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दर्शन:अभयारण्य देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास क्षेत्र