Headlines

माजी विद्यार्थ्यांची शाळेसाठी अनोखी गुरुदक्षिणा:सीताबाई संगई विद्यालयाला टीव्ही भेट, शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार‎




शाळेतून शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त करत सीताबाई संगई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला दोन डिजिटल टीव्ही भेट दिले आहेत. बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने दिलेली ही स्नेहभेट शाळेसाठी प्रेरणादायी ठरली आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात आलेल्या या भेटीत एक डिजिटल टीव्ही माजी विद्यार्थी सुनील झोंबाडे यांनी वैयक्तिकरित्या प्रदान केला, तर दुसरा डिजिटल टीव्ही सन १९८१ च्या दहावी उत्तीर्ण संपूर्ण बॅचच्या वतीने देण्यात आला. शाळेच्या विकासात प्रत्यक्ष योगदान देत माजी विद्यार्थ्यांनी ‘शाळेचे ऋण फेडण्याचा’ आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या डिजिटल टीव्हींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृक्-श्राव्य स्वरूपात अध्यापनाचा लाभ मिळणार आहे. विविध विषयांतील शैक्षणिक व्हिडिओ, सादरीकरणे, नकाशे, आकृत्या आणि डिजिटल सामग्री वर्गखोल्यांमध्ये सहजपणे दाखवता येणार असल्याने विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक रंजक, सुलभ आणि परिणामकारक बनणार आहे. सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. उल्हास संगई, प्राचार्य राकेश डोणगावकर, उपमुख्याध्यापक राजेश वैद्य, पर्यवेक्षक डॉ. निलेश डहाळे यांच्यासह संचालक मंडळाने या उपक्रमाचे स्वागत करत माजी विद्यार्थ्यांच्या शाळेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे कौतुक केले. शिक्षणक्षेत्रात माजी विद्यार्थ्यांचे योगदान केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शाळेच्या गुणवत्तावृद्धीचे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचे उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले. माजी विद्यार्थ्यांनी दिलेली ही डिजिटल गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवी दालने खुली करणारी ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *