Headlines

शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी असावी- कृष्णा डोणगावकर:ढोरेगावात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात; ‘निपुण महाराष्ट्र’वर विचारमंथन‎




शिक्षण व्यवस्था ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी आणि त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी असली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही, त्यांना केवळ योग्य संधी, दर्जेदार मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची गरज आहे. ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील मूलभूत क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी शिक्षकांनी कृतीआधारित व आनंददायी अध्यापनावर भर द्यावा, असे प्रतिपादन शेंदूरवादा गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे मंगळवारी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसह विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना डोणगावकर म्हणाले, शिक्षकांनी केलेली अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. लोकसहभागातून शाळांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व समाजाचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत. ढोरेगाव केंद्रातील शिक्षकांनी एकत्रित काम करून शैक्षणिक गुणवत्तेत आदर्श निर्माण करावा. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व शैक्षणिक उपक्रमांना माझे सदैव सहकार्य राहील. या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य रावसाहेब टेके पाटील, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, केंद्रप्रमुख सचिन डमाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष खलील पटेल, अयुब पटेल, उपसरपंच पुंजाराम पठाडे, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, शिक्षक राजेश हिवाळे, रामकिशन पांचाळ, अजित पवार, अशोक शेवाळे, राजू गावंडे, सुरेंद्र सूर्यवंशी, रामू पठाडे, सुरेश पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे, रफिक शेख व विशाल जोशी यांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख सचिन डमाळे यांच्या अध्यक्षीय समारोपाने परिषदेची सांगता झाली. परिषदेतून मिळालेले ज्ञान शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा कुलकर्णी यांनी केले, तर घुले यांनी आभार मानले. विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत शिक्षकांसाठी विविध सत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘निपुण महाराष्ट्र’ भाषा कृती कार्यक्रमावर मनेश दारकुंडे तर गणित कृती कार्यक्रमावर मुग्धा निमसे यांनी मार्गदर्शन केले. ‘नियोजन व लोकसहभाग’ सत्रात संजीवनी सोन्नी यांनी मासिक नियोजन, तर दिलीप लोणकर यांनी लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले. ‘अध्ययन समृद्धी’ सत्रात ऐश्वर्या तुपे यांनी डॉ. जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची माहिती दिली, तर सुनिता कोटुरवार यांनी आनापान साधना व राज्यस्तरीय शैक्षणिक विषयांवर विचार मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *