Headlines

Gunratna Sadavarte Slams Manoj Jarange Over Maratha Reservation Protest


मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ज्येष्ठ वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “हे आंदोलन नसून दरवर्षी येणारा टीव्ही सीरिअलचा शो आह

.

तसेच, महिला आयएएस अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करणे, मुंबईची शांतता भंग करणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा अवमान केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना तत्काळ अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (JMFC) हजर करावे, अशी थेट मागणी त्यांनी केली.

जरांगे शोचे प्रोड्युसर शिंदे, तर डायरेक्टर सामंत

पत्रकार परिषदेत राजकीय स्थितीवर ताशेरे ओढताना सदावर्ते म्हणाले, “राज्यात सध्या जातीय राजकारणाचा एक सीझन सुरू आहे. टीव्हीवर जशा मालिकांचे एपिसोड सुरू असतात, तसाच हा ‘जरांगे सीझन’ आहे. या सीझनचे प्रोड्युसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, डायरेक्टर उदय सामंत आहेत आणि मनोज जरांगे हे मुख्य कलाकार आहेत.”

“हे आंदोलन नसून पूर्णपणे स्क्रिप्टनुसार चालणारा शो आहे. मंत्री अंतरवलीत जाणार, चर्चा करणार, तिथे रुग्णवाहिका तयार राहणार आणि रुग्णालयात दाखल होणार; हे सगळे आधीच ठरलेले असते. जनतेच्या करमणुकीचा आणि यूट्युबर्सच्या रोजीरोटीचा हा विषय झाला आहे.”

महिला जिल्हाधिकाऱ्यांसमोर वापरलेल्या भाषेवर आक्षेप

जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जरांगे यांच्यातील संवादाचा संदर्भ देत सदावर्ते म्हणाले. एका महिला आयएएस अधिकाऱ्यासमोर ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. “देशातील आयएएस असोसिएशन आणि महिला संघटना आता कुठे गेल्या? एका महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाला धक्का लागत असताना त्या शांत का आहेत?” असा सवाल त्यांनी केला. उदय सामंत यांनी जरांगेंच्या प्रकृतीपेक्षा त्यांच्या भाषेची आणि वर्तनाची चिंता केली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जरांगेंना तत्काळ अटक करा; मुंबईला वेठीस धरू देणार नाही

जरांगे यांनी 12 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्ते आक्रमक झाले. “संविधानाने ‘जगण्याचा अधिकार’ दिला आहे, उपोषण करून स्वतःला संपवण्याचा किंवा वेठीस धरण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांना कायद्यानुसार ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले पाहिजे.”

“45 लाख गाड्या घेऊन मुंबईत येण्याची भाषा केली जात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ती वेठीस धरू दिली जाणार नाही. रस्त्यांवर टायर जाळणे, वाहतूक अडवणे हे आंदोलन नसून सामान्यांना वेठीस धरणे आहे. जर कायदा मोडला जात असेल तर जरांगे यांना थेट अटक झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

दुहेरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर कायदेशीर आक्षेप

मंत्रिमंडळ उपसमितीच्या पत्रकार परिषदेवर बोलताना सदावर्ते यांनी आरक्षणाच्या कायदेशीर चौकटीवर प्रश्न उपस्थित केले. “एकाच समाजाला एसईबीसी (SEBC) मधून १० टक्के आरक्षण द्यायचे आणि पुन्हा कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसीतूनही आरक्षण द्यायचे, हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. संविधानात अशा दुहेरी आरक्षणाची तरतूद नाही.”

सर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ मधील ‘एफसीआय विरुद्ध जगदीश बेरा’ खटल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्याचे सर्व लाभ आपोआप रद्द होतात. जात वैधता प्रमाणपत्र नसताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क सरकार भरेल, हे मंत्र्यांचे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी विसंगत आहे. जनतेच्या कराचा पैसा असा नियमबाह्य पद्धतीने वापरता येणार नाही.” जात पडताळणी समिती ही अर्ध-न्यायिक संस्था असून तिच्या अधिकारात कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

संजय शिरसाट यांना पत्रकार परिषदेतून डावलल्याचा आरोप

सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि समाजकल्याण विभागाशी संबंधित मंत्री संजय शिरसाट यांना विखे पाटील आणि उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत का बोलावले गेले नाही? ते केवळ अनुसूचित जातीचे (SC) आहेत म्हणून आरक्षणाच्या चर्चेतून त्यांना अस्पृश्यासारखे वाळीत टाकले गेले का? ही एक प्रकारची संस्थात्मक अमानुषता आहे,” असा आरोप त्यांनी महायुती सरकारवर केला.

फोटोवरून राजकारण करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला

पुण्यातील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्यावरून झालेल्या वादावर बोलताना त्यांनी मनसेवरही टीका केली. “प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे वलय होते, ते आधी उद्धव ठाकरे आणि नंतर राज ठाकरे यांनी घालवले. आता फोटोवरून राजकारण केले जात आहे.” “दादरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि मोदींच्या युवा समर्थकांनी राज ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मुंबई ही कोणा एकाची मक्तेदारी नसून सर्वांची आहे, हेच यातून सिद्ध झाले,” असे सदावर्ते म्हणाले.

शेवटी, “लक्ष्मण हाके किंवा इतर ओबीसी, एससी, एसटी नेत्यांचे लढा संवैधानिक आहे; मात्र जरांगेंचे आंदोलन हे मुंबई वेठीस धरून खंडणीखोरी आणि नौटंकी माजवणारे आहे. त्यामुळे कायद्यानुसार सरकारने जरांगेंना तत्काळ गजाआड करावे,” असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा…

LIVE मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस: बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.