![]()
नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व उत्सवांमध्ये डीजे, प्लाझ्मा साऊंड सिस्टिम आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर बीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हे साहित्य आणि वाहने जागेवरच सीलबंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे डीजे चालक आणि उत्सव मंडळांना धक्का बसला आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार हे आदेश काढले आहेत. हे आदेश ३ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून ते १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहतील. या काळात येणाऱ्या दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुल अवलिया छब्बीसवी, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुर्गादेवी उत्सव यांसारख्या सर्व सणांमधील मिरवणुका व कार्यक्रमांना हा नियम लागू होईल. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, डॉल्बी (टॉप, मिड, बेस असलेली मल्टीस्पीकर सिस्टीम), प्लाझमा साऊंड सिस्टीम, प्रेशरमिड साऊंड सिस्टीम आणि वाहनांमध्ये केलेले बेकायदेशीर बदल पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या सिस्टीमचे मालक, धारक आणि उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य सीलबंद करून ठेवावे. त्याचा वापर करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. लेझर बीम आणि बीम लाईटमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका असतो. तसेच नागरिकांच्या डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. त्यामुळे यावरही बंदी घालण्यात आली असून, ते साहित्य सीलबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचे नियम आणि मानवाधिकार आयोगाच्या इशाऱ्यानंतरही अनेक ठिकाणी ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जाते. यामुळे पोलीस आणि मंडळांमध्ये वाद होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी नागपूर पोलिसांनी साऊंड सिस्टीम आणि बदल केलेली वाहने जागेवरच जप्त करून सील करण्याची कारवाई निश्चित केली आहे. मात्र, पर्यावरण रक्षण कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदूषण नियमांनुसार मर्यादेत वाजणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
Source link
नागपूरमध्ये डॉल्बी, प्लाझ्मा आणि लेझर बीमवर पूर्ण बंदी:पोलिस आयुक्तांचा कडक निर्णय, सिस्टिम जागेवरच सीलबंद होणार