Headlines

गंगापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का:अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट शिंदे गटात, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश




सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बालवयापासून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नंदनवन निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार संदिपान भुमरे साहेब, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब, माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब, आमदार विलास बापू भुमरे, संपर्कप्रमुख विलास पारकर, तालुकाप्रमुख दिलीपजी निरफळ, शहरप्रमुख बाबा कराळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांच्या कुटुंबाची शिवसेनेशी जुनी नाळ असून, त्यांचे वडील दिलीपराव धाट यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षविस्तारासाठी अग्रभागी राहून काम केले आहे. शिवसेनेच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना त्यांनी अनेक वेळा लाठ्या-काठ्यांचा सामना केला, केसेस अंगावर घेतल्या तसेच तुरुंगवासही भोगला. संघर्षाची ही परंपरा पुढे नेत विद्यार्थी दशेपासुन अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांनीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम सुरू ठेवले आहे. अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांनी सामाजिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. कायद्याचे ज्ञान, सामाजिक कार्याचा अनुभव आणि आक्रमक कार्यपद्धती यामुळे त्यांनी अल्पावधीतच तरुण कार्यकर्त्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांनी शिवसेनेचे विचार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या त्रिसूत्रीवर आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “संघर्षाची भूमिका कधीच बदलणार नाही; हिंदुत्वाच्या विचाराशी ठाम राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक आक्रमकपणे काम करू पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल,” असा निर्धार अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांनी व्यक्त केला. अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांच्या शिवसेना प्रवेशामुळे गंगापूर तालुक्यात पक्ष संघटनेला नवी ताकद मिळणार असून युवा कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *