![]()
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी सचिन खुशाल कारेमोरे (वय ४०, रा. नेरी, जि. भंडारा) याला अटक केली आहे. त्याने भारतीय स्टेट बँकेच्या मौदा आणि रामटेक शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे कृषी कर्ज उचलले होते. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकातून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. या प्रकरणातील आरोपी गरीब आणि कमी शिकलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ७/१२ उतारे मिळवून बँकेत इंग्रजी कागदपत्रांवर सह्या घेतल्या जात होत्या. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे कृषी कर्ज उचलले जात होते. आरोपींनी बनावट कंपन्या तयार करून कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा केली होती. तपासात असे समोर आले आहे की, बनावट वेअरहाउस परवाने आणि खोट्या इलेक्ट्रॉनिक पावत्या वापरून बँकेतून कर्ज घेतले गेले. या प्रकरणी मौदा आणि रामटेक पोलीस ठाण्यात एकूण १६ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. मुख्य आरोपी सचिन कारेमोरे याच्यावर यापूर्वी भंडारा, गडचिरोली आणि अहेरी येथे धान घोटाळ्याचे गुन्हे दाखल आहेत. उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार होता. २ सप्टेंबर रोजी त्याला नागपूर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
Source link
73 कोटींच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी अटकेत:नागपूर रेल्वे स्थानकातून 'ईओडब्ल्यू'ने केली कारवाई; बनावट कागदपत्रांनी उचलले होते कृषी कर्ज