![]()
पुण्यातून तरुणाचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेशात घेऊन जाणाऱ्या संशयितांच्या कारचा समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी तब्बल तीन किलोमीटर थरारक पाठलाग करत कार अडवली. ही घटना बुधवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न उधळून लावत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील चिखली परिसरातून आरशद शकील अहमद सिद्दीकी (वय २४) या तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाला दिली. संशयित कार (युपी ९०, एई ९३७५) मधून तरुणाला घेऊन सिन्नरच्या दिशेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाभळेश्वर विभागाच्या महामार्ग पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांचे पथक चॅनल क्र. ५३२ ते ५०२.७ दरम्यान गस्त घालत असताना चॅनल क्र. ५२३ जवळ संशयित कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारचा पाठलाग सुरू केला. तब्बल तीन किलोमीटरच्या पाठलागानंतर चॅनल क्र. ५२० जवळ पोलिसांनी कारला घेराव घालत थांबवले. कारमध्ये असलेल्या महमद अन्वर सिद्दीकी (३९), निजामुद्दीन सिद्दीकी (४१), फाजील हुसेन सिद्दीकी (२३), महंमद साहील सिद्दीकी (२१), महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी (२६) या महिलेसह सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सर्वजण उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. महामार्ग पोलिसांनी पीडित तरुण, सहा संशयित आणि अर्टिगा कार कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जमा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक संशयितांचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले असून, अपहरणामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई बाभळेश्वर महामार्ग पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक विक्रान्त कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठोंबरे, पोलिस नाईक महेश बोरुडे, रामचंद्र साळुंके, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, रोहित आरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली.
Source link
सहा किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत अपहरणकर्त्यांना समृद्धी महामार्गावर पकडले!:पुण्याहून तरुणाला उत्तरप्रदेशात नेत असतानापोलिसांची कारवाई