Headlines

भंडाऱ्याची देणगी गोळा करताना हल्ला:दारूसाठी पैसे न दिल्याने 22 हजारांची रोकड पळवली




साताऱ्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भंडाऱ्यासाठी नागरिकांकडून देणगी स्वीकारत असलेल्या व्यक्तीला दारूसाठी पैसे मागून, पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना सातारा शहरातील गोडोली येथील समाज मंदिर परिसरात घडली. या प्रकारात हल्लेखोराने संबंधिताच्या गळ्यातील हँडबॅग जबरदस्तीने हिसकावून घेत त्यातील 22 हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी हर्षद भरत संकपाळ (वय 46, रा. विलासपूर, गोडोली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय संजय पार्टे (रा. गोडोली) याच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास संकपाळ देणगी स्वीकारत असताना पार्टे याने दारूसाठी पैसे मागितले. नकार मिळताच त्याने शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बॅग हिसकावून नेली. बॅगेत 500 रुपयांच्या 40 आणि 100 रुपयांच्या 20 नोटा होत्या. पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीचा हात पकडून भेटीचा हट्ट; फोटो इन्स्टाग्रामवर केला व्हायरल दुसऱ्या एका घटनेत सातारा शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडत भेटण्याचा हट्ट धरणे, तसेच तिचा फोटो इन्स्टाग्राम स्टेटसवर प्रसारित केल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विकृत प्रकारामुळे परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पीडित मुलीच्या 43 वर्षीय आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषभ जगन बढेकर (वय 20, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी मंगळवार पेठेतील सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. त्याने तिचा हात पकडून भेटण्याचा तगादा लावला. मुलीने सुटका करून आत प्रवेश केल्यानंतरही आरोपीने शिवीगाळ करत दरवाजावर दगड मारला. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आरोपीने मुलीचा फोटो एका गाण्यासह इन्स्टाग्राम स्टेटसवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. शाहूपुरी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *