Headlines

घाटघर आश्रमशाळेत शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात:पालकांचा ठिय्या, प्रश्न न सुटल्यास नाशिकपर्यंत आंदोलनाचा इशारा‎




जिल्ह्यातील आदिवासीबहुल, दुर्गम अकोले तालुक्यात पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करून वाडी-वस्त्यांवरील मराठी प्राथमिक शाळा बंद करण्याचे निर्णय घेतले जात असताना, जिथे विद्यार्थी आहेत तिथे मात्र शिक्षकच नसल्याचा गंभीर प्रकार घाटघर येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत समोर आला आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नसल्याने संतप्त पालकांनी थेट शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर येथे ही आश्रमशाळा आहे. येथे दहावीपर्यंत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध एका शिक्षकावर तीन-तीन वर्गांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अध्यापनासोबतच विविध अशैक्षणिक कामांचाही भार असल्याने शिक्षकांची दमछाक होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होत आहे. शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पालकांनी राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे वारंवार निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला. अखेर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रांगणातच ठिय्या देत प्रशासनाचा निषेध केला. एकीकडे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून शिक्षक अतिरिक्त ठरविले जात आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थी असलेल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त ठेवली जात असल्याने प्रशासनाच्या धोरणावर पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू असली तरी दुर्गम भागात शिक्षक रुजू होतील की नाही, याबाबत पालकांमध्ये साशंकता आहे. शिक्षण हक्क आहे, मेहेरबानी नाही! घाटघर आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. शिक्षकांची पदे पूर्णपणे भरली जात नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही. प्रश्न सुटला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करून नाशिक येथील आदिवासी भवनासमोर मोर्चा काढण्यात येईल, अशा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *