Headlines

बागेत शास्त्रज्ञ, बांधावर चर्चा:मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विज्ञानाची साथ, गोपाळपूरमध्ये शेतकरी,‎शास्त्रज्ञ मंचाची बैठक‎




मोसंबी उत्पादनातील अडचणींवर थेट शेताच्या बांधावर शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्पांतर्गत मोसंबी उत्पादक शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नेवासे तालुक्यातील गोपाळपूर येथे झाली. यावेळी प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. रणजीत कडू, रोगशास्त्रज्ञ प्रा. मधुकर शेटे आणि मंचाचे अध्यक्ष साहेबराव ताठे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या सूचनेनुसार विविध पिकांसाठी शेतकरी-शास्त्रज्ञ मंच स्थापन करण्यात येत असून, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील आणि प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी डॉ. सुमती दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर येथे या मंचाची स्थापना करण्यात आली आहे. बैठकीत मोसंबी लागवड तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन, फळगळ नियंत्रण, फळांची गुणवत्ता व उत्पादनवाढ तसेच सुधारित वाण आणि पीक संरक्षणाच्या शिफारशी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. मधुकर शेटे यांनी रोगांमुळे होणारी फळगळ व तिचे व्यवस्थापन, तर डॉ. रणजीत कडू यांनी विविध किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. फळगळीस कारणीभूत ठरणाऱ्या रसशोषक पतंग आणि फळमाशीच्या नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला. फळमाशीच्या अटकावासाठी संशोधन प्रकल्पाने शिफारस केलेल्या स्लो रिलीज फेरोमन ट्रॅपचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. बैठकीनंतर शास्त्रज्ञांनी गोपाळपूर परिसरातील मोसंबी बागांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *