.

एखाद्या मुलाने उद्या डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा अधिकारी व्हावे, एवढीच शिक्षकांची भूमिका राहिलेली नाही; तर त्याने जिज्ञासू, विचार करणारा, समस्या सोडवणारा, आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक व्हावे, यासाठी त्याच्या बालपणातच योग्य संस्कार आणि अनुभवांची पेरणी करणे आवश्यक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून राहाता तालुक्यातील वाकडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शिक्षणाची नवी प्रयोगशील वाट तयार झाली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांच्या या धडपडीकडे पाहिले असता, येथे शिक्षक धडे शिकवत नाहीत, तर भविष्य घडवत आहेत, असे चित्र दिसते.
मुख्याध्यापक चंद्रकांत दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सर्जेराव घोडके, विनय गिरी, रवींद्र भालके, मीरा बनगोसावी आणि लक्ष्मीकांत इडलवार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयोगशील अध्यापन करीत आहेत.
वाकडीच्या शाळेतील ‘स्वप्नातील गाव’ हा उपक्रम याचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यापासून घरे, रस्ते, झाडे, स्विमिंग पूल, कचराकुंड्या आदी तयार करून आपल्या कल्पनेतील गाव साकारले. खेळता-खेळता गावाची रचना, स्वच्छता, पर्यावरण, नियोजन आणि सामूहिक जबाबदारी यांचा अनुभव मुलांना मिळाला.
गणितही येथे केवळ वहीत राहत नाही. ‘पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण’ हे अपूर्णांक प्रत्यक्ष कृतीतून समजावले जातात. घड्याळ वाचनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः घड्याळ तयार केले, तर मैदानावर मोठे घड्याळ उभारून काटे फिरवत वेळेचे गणित शिकवले जाते. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या संकल्पना अनुभवातून सहज समजतात.
‘चार भिंतीबाहेरचे अध्ययन-अध्यापन’ या उपक्रमातून निसर्ग आणि परिसरच विद्यार्थ्यांची वर्गखोली बनतो. ‘खुले वाचनालय’ विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी देते. त्याचबरोबर वक्तृत्व, गायन, वेशभूषा आणि लेझीममधून आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित केले जात आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे ३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.
उद्याच्या परीक्षेसाठी नव्हे, तर उद्याच्या आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, हा वाकडी शाळेतील शिक्षकांचा ध्यास आहे. शिकवलेल्या धड्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेली जिज्ञासा, कल्पकता, आत्मविश्वास आणि चांगला नागरिक होण्याची जाणीव हीच शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या कार्याची खरी पावती ठरत आहे.
लेझिमच्या तालावर संस्कृतीची पावले ^पारंपरिक लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना लेझिमचे प्रशिक्षण दिले जाते. ताल, लय आणि शिस्तीचा संगम असलेल्या लेझिमच्या सरावातून विद्यार्थ्यांत शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता, संघभावना आणि आत्मविश्वास वाढत आहे. शाळेतील विद्यार्थी देशभक्तीपर , शेतकरी गीतांवर लेझिमचे सादरीकरण करीत असून, विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कलाविष्काराचे कौतुक होते.पारंपरिक लोककला जपत आधुनिक शिक्षणाची सांगड घालण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण करुन चांगला माणूस घडवण्यासाठी आम्ही शिक्षक प्रयत्न करत आहोत. -लक्ष्मीकांत इडलवार, शिक्षक, जि. प. केंद्र शाळा, वाकडी.