![]()
संत गाडगेबाबांनी कृतीतून स्वच्छतेचा, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश दिला. या संतांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत तालुक्यातील पार्डी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल २२ हजार वृक्षांची लागवड, डिजिटल शिक्षण, सौरऊर्जा, शुद्ध पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाचनालय, क्रीडांगण, व्यायामशाळा यांसह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने पार्डीची २८ हजार ग्रामपंचायतींतून राज्यस्तरीय तपासणीसाठी निवड झालेल्या १२ ग्रामपंचायतीमध्ये राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्रता मिळविली आहे. त्यामुळे आता पार्डी ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत उतरली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापन तपासणीदरम्यान ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पार्डी येथे भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शरीराची स्वच्छता जशी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गावाची स्वच्छताही महत्त्वाची असल्याचे सांगितले. गाव स्वच्छ व निरोगी राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहू शकते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी पोपट पवार, मल्लिनाथ कलशेट्टी, श्रीधर दुबे, गिरीश भालेराव, शारदा गायधने, प्रशांत पाटील, सागर मनोहरे, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, पारडी गावच्या सरपंच्या वर्षा वानखडे, उपसरपंच प्रवीण ठवळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पार्डी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य दिले असून, गेल्या पाच वर्षांत २२ हजार वृक्षांची लागवड केली आहे. शाळेत डिजिटल शिक्षण प्रणाली, शाळा परिसर व वर्गखोल्यांमध्ये ११ सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियानात विभागस्तरावर प्रथम ५० लाख रुपये व द्वितीय १५ लाख रुपये, तालुका सुंदर गाव प्रथम पुरस्कार १० लाख रुपये तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार ४.५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
Source link
राज्यस्तरीय तपासणीसाठी 12 ग्रामपंचायतींत होणार निवड:पाच वर्षांत तब्बल 22 हजार वृक्षांची लागवड अन् डिजिटल शिक्षण