![]()
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, 6 सप्टेंबर रोजी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. हिंजवडीतील इन्फोसिस सर्कल, फेज-1 परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या आंदोलनात आयटी कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक रहिवासी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हेदेखील मोर्चात सहभागी झाले आहेत. हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. खराब रस्ते, खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, प्रदूषण आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत विविध आयटी कंपन्या, कर्मचारी संघटना आणि स्थानिक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी परिसरात सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. इन्फोसिस सर्कल, हिंजवडी फेज-1 पासून वर्तुळाकार पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हिंजवडी, माण, मारुंजी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकही सहभागी झाले. वर्षभरापासून पायाभूत सुविधांची प्रतीक्षा आयटी क्षेत्रातील विविध संघटनांच्या म्हणण्यानुसार, हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप अपेक्षित स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, देशातील महत्त्वाच्या आयटी हबपैकी एक असलेल्या हिंजवडी परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. खराब रस्त्यांमुळे कर्मचारी आणि नागरिक त्रस्त असोसिएशनचे पवनजीत माने यांनी सांगितले की, हिंजवडी आयटी क्षेत्रात दररोज दूरदूरवरून हजारो कर्मचारी कामासाठी येतात. मात्र, परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या प्रवासात अनेक तास खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अपघात, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे हिंजवडी परिसरातील परिस्थिती गंभीर बनल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. हिंजवडीतील रहिवासी प्रशांत भोपळे यांनीही परिसरातील समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली. अरुंद रस्ते, खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी ही येथील नागरिकांची दैनंदिन समस्या बनली आहे. विशेषतः लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रस्ते रुंदीकरणासह मेट्रोची मागणी आंदोलकांनी हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, वाकड-बालेवाडी परिसरात ट्रान्झिट हब विकसित करून आयटी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडवावा, अशीही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. राधिका जोगे यांनी सांगितले की, परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी रस्ते, पाणी आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्काच्या सुविधांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नम्रता नाईक यांनी खड्डे, अपघात आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. हिंजवडी परिसराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि आयटी क्षेत्रातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधांचा तातडीने सर्वंकष आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली. विविध संघटनांचा मोर्चात सहभाग या आंदोलनात स्थानिक शेतकरी, रहिवासी, आयटी कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, माण-हिंजवडी-मारुंजी इन्फ्रा फोरम, एफआयटीई, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन, मुळशी हौसिंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन तसेच इतर स्थानिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील प्रमुख आयटी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न आता अधिक तीव्र बनला आहे. रस्ते, वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. हेही वाचा.. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती:देशभरातील 8 उच्च न्यायालयांत नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. .केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली.सविस्तर वाचा..
Source link
हिंजवडीच्या पायाभूत सुविधांसाठी आयटी कर्मचारी रस्त्यावर:इन्फोसिस सर्कलपासून मोर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी