![]()
एरवी केवळ पावसाळ्यात डोंगरदऱ्यांत किंवा शेताच्या बांधांवर नैसर्गिकरीत्या उगवणारी दुर्लक्षित रानभाजी म्हणजे ‘कर्टुले’ (करटोली). मात्र, याच रानभाजीला मुख्य प्रवाहातील नगदी पीक बनवून फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील बी.एससी पदवीधर कृष्णा फलके या उच्चशिक्षित तरुणाने शेतीत नवा प्रयोग केला आहे. पारंपरिक पिकांच्या चक्रातून बाहेर पडत त्यांनी अवघ्या दीड एकर शेतात कर्टुल्याची यशस्वी व्यावसायिक लागवड केली. त्यातून ते दर आठवड्याला तब्बल 40,000 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. कर्टुल्याचे आरोग्यदायी महत्त्व ओळखून प्रयोग कर्टुल्याचे वाढते आरोग्यदायी महत्त्व ओळखून 2018 मध्ये कृष्णा यांना या प्रयोगाची कल्पना सुचली. त्यांनी सुरुवातीला स्वतः डोंगरदऱ्यांत फिरून कंटुरल्याचे नैसर्गिक बियाणे गोळा केले. 2019 मध्ये अवघ्या 3 गुंठ्यांत प्रयोग करून बियाणे तयार केले आणि पुढे 10 गुंठ्यांत लागवड वाढवली. बियाणे विक्रीसह कर्टुले रोपवाटिका सुरू केली या यशस्वी प्रयोगानंतर 2022 मध्ये त्यांनी 10,000 ते 12,000 रुपये प्रति किलो दराने बियाणे विक्री सुरू केली. प्रयोगाचा पुढील टप्पा म्हणून 2026 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पहिली “कर्टुले रोपवाटिका’ सुरू करून रानभाजी शेतीला पूर्णपणे व्यावसायिक रूप दिले. हे पूर्णपणे नैसर्गिक पीक असल्याने यावर रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा कोणताही अतिरिक्त खर्च होत नाही. व्यापारी शेतावर येऊन माल खरेदी करतात दर तिसऱ्या दिवशी कंटुरल्याची काढणी केली असता आठवड्याला 2 ते 2.25 क्विंटल उत्पादन निघते. सध्या बाजारपेठेत या रानभाजीला 200 रुपये प्रति किलोचा उत्तम दर मिळत असून, व्यापारी थेट शेतावर येऊन माल खरेदी करतात. शिल्लक राहिलेला माल जालना व छत्रपती संभाजीनगर येथे मागणीनुसार पाठवला जातो. उत्पन्न आणि खर्चाचे गणित असे कर्टुल्याच्या शेतीसाठी सुरुवातीला 18,000 रुपयांचा मांडवावर खर्च करावा लागतो. पूर्णपणे नैसर्गिक पिक असल्याने खते व औषधांचा खर्च काहीही लागत नाही. दर आठवड्याला 2 ते 2.25 क्विंटल उत्पादन निघते. सध्या 200 रुपये प्रतिकिलोप्रमाणे कर्टुल्याला भाव मिळतो. या दृष्टीने सध्या आठवड्याला 40,000 रुपये उत्पन्न मिळत आहे. याशिवाय बियाणे विक्रीतून प्रतिकिलोला 10,000 ते 12,000 रुपये वेगळे मिळतात. (प्रगतिशील शेतकरी कृष्णा फलके यांचा मोबाइल नंबर 9545441504)
Source link
प्रगतिशील शेतकरी:शेतात कर्टुले पिकवून आठवड्याला 40 हजारांची कमाई; छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधर तरुणाचा दीड एकरात प्रयोग