Headlines

बॉल बॅडमिंटनसारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज:आ. संजय खोडके, 33 संघांच्या कौशल्याची रंगणार जुगलबंदी‎




खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, सरावासाठी आवश्यक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण मिळाल्यास हे खेळाडू राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्राचा विस्तार करण्यासोबतच क्रीडा सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना खेळाडूंना प्रोत्साहनाची जोड मिळणे तितकेच आवश्यक आहे. बॉल बॅडमिंटनसारख्या पारंपरिक आणि कौशल्यपूर्ण खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अमरावतीमध्ये अधिकाधिक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व्हावे, यासाठी पुढील काळातही आवश्यक ते सहकार्य करण्याचा विश्वास विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला. दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन संलग्नित अमरावती जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन आणि श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७० व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संजय खोडके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा अमरावतीचे सुपुत्र भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तीन दिवसीय या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव अतुल इंगळे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. हरीश काळे, आयोजन समितीचे सचिव मनीष इंगोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून तसेच क्रीडा ध्वजारोहण करून या राज्यस्तरीय स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यामुळे स्पर्धास्थळी क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या उद्घाटनपर संबोधनात आमदार संजय खोडके म्हणाले की, अमरावती शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी विविध क्रीडा प्रशिक्षण उपक्रम, सरावाच्या सुविधा तसेच स्पर्धांचे आयोजन करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. अलीकडच्या काळात अमरावतीमध्ये विविध खेळांच्या राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे अमरावती शहराची ओळख आता क्रीडानगरी म्हणून निर्माण होत आहे. दरम्यान, उद्घाटन समारंभामध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड आणि जिजाऊ कमर्शिअल बँकेचे अध्यक्ष बबनराव आवारे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अमरावतीच्या क्रीडा विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतल्याबद्दल आयोजन समितीचे अध्यक्ष यश खोडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी बीपीएडच्या प्रांगणात तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३३ पुरुष संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी जवळपास ४५० खेळाडू, संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि ऑफिशियल्स यांचे अमरावतीनगरीत आगमन झाले आहे. त्यामुळे शहरातील क्रीडा वातावरणाला चांगलीच रंगत आली आहे. खेळातून तणावमुक्ती आणि निरोगी जीवनशैली प्रसिद्ध सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, प्रत्येकामध्ये खेळाची भावना असली पाहिजे. खेळाकडे केवळ जिंकणे किंवा हरणे या दृष्टिकोनातून न पाहता, त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ विजय मिळवण्यासाठीच खेळाचे महत्त्व नसून, व्यक्तिगत जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी, तणावमुक्त राहण्यासाठी तसेच निरोगी जीवनशैली जोपासण्यासाठीही खेळाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीचा किमान एक तरी खेळ निवडून त्यातील क्रीडा कौशल्याची जोपासना करावी, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *