Headlines

महापौर रितू तावडेंची घोषणा:विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, ठाकरे गटाला मोठा धक्का




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत महापौर रितू तावडे यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशाखा राऊत यांनी ओबीसी महिला राखीव जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तपासणी केल्यानंतर त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. न्यायालयातूनही मिळाला नाही दिलासा जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते. या कारवाईविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद जाणार, हे जवळपास निश्चित झाले होते. यानंतर राज्याच्या नगरविकास विभागानेही यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. अखेर मुंबई महापालिकेच्या सभेत महापौर रितू तावडे यांनी विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची औपचारिक घोषणा केली. पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी नगरसेवकपद रद्द होण्याबरोबरच विशाखा राऊत यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 197 मतांनी मिळवला होता विजय विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या जागेसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत विशाखा राऊत यांनी शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता. विशाखा राऊत यांना 13,326 मते मिळाली होती, तर प्रिया सरवणकर यांना 13,039 मते मिळाली होती. म्हणजेच अवघ्या 197 मतांनी विशाखा राऊत विजयी झाल्या होत्या. प्रिया सरवणकर यांनी घेतला होता आक्षेप प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर तसेच क्षेत्राधिकारावर आक्षेप घेतला होता. त्यांनी याबाबत संबंधित समितीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे प्रमाणपत्र अवैध असल्याचे निष्पन्न झाले. या निर्णयानंतर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद अडचणीत आले होते. या संपूर्ण प्रकरणात विशाखा राऊत यांनी आपल्याविरोधात राजकीय दबाव आणि कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी सदा सरवणकर यांच्यावरही जोरदार टीका केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेची संख्या 64 वर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकूण 65 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे आता ही संख्या 64 वर आली आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणे हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दुसरीकडे या निर्णयाचा राजकीय परिणाम महापालिकेतील पक्षीय संख्याबळावरही होणार आहे. 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दरम्यान, मुंबई महापालिकेतील एकूण 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आतापर्यंत पाच नगरसेवकांचे पद रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना चुकीचे किंवा खोटे जात प्रमाणपत्र सादर करणे, संपत्तीची माहिती लपवणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती लपवणे असे आरोप काही नगरसेवकांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गोंधळ दरम्यान, विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाच्या घोषणेदरम्यान मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यास झालेला विलंब आणि जेम पोर्टलवरील खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. सभागृह नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेताना किशोरी पेडणेकर यांनी, “सभागृह नेत्यांचा मी आदर करते; मात्र ते अंगावर येणार असतील तर हे योग्य नाही,” असे म्हटले. सभागृह नेत्यांचा विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना सभागृह नेते गणेश खणकर यांनीही प्रत्युत्तर दिले. “नीतिमत्ता आमच्यात शिल्लक आहे. आजही मुंबई पाहत आहे की कोण गोंधळ घालत आहे. आमच्या घरातही आमच्या बहिणी आहेत. दुसरे बोलत असताना ऐकण्याची क्षमता ठेवली पाहिजे,” असे खणकर यांनी सुनावले. यानंतर सभागृहातील गोंधळ वाढत असल्याचे पाहून महापौर रितू तावडे यांनी सर्व सदस्यांना कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. एका विषयावर चार-चार तास चर्चा करू नका. सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. गोंधळ झाल्यास सभागृहातील अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित राहतात, असे महापौरांनी स्पष्ट केले. दरम्यान, विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या संख्याबळात घट झाली असून, या निर्णयाचे आगामी काळात महापालिकेच्या राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. ‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’:नाशिक महापालिका आयुक्तांचे थेट ओपन चॅलेंज; काँक्रिट रस्त्यांची तज्ज्ञांकडून कसून पाहणी नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आक्षेप घेणाऱ्यांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत चूक दाखवा, मी माझे नाव बदलेन, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *