![]()
जळगाव शहरातील प्रसिद्ध ‘सुभाष चौक मित्र मंडळा’च्या दहीहंडी उत्सवात बक्षीसाच्या रकमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आयोजकांनी जाहीर केलेली रक्कम देण्यास ऐनवेळी नकार दिल्याने संतापलेल्या ‘गोपाळ पेठ मंडळा’च्या गोविंदांनी थेट दहीहंडीच्या खालीच ठिय्या मांडून ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. बक्षीसावरून झालेल्या या फसवणुकीच्या आणि मनमानी कारभाराच्या प्रकारामुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही या उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हंडी फोडणाऱ्या आणि सर्वाधिक थर लावून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आयोजकांकडून प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून मोठ्या रकमेच्या बक्षीसांची घोषणा करण्यात आली होती. आयोजकांनी जाहीर केलेल्या याच बातमीच्या आधारावर जळगावच्या ‘गोपाळ पेठ मंडळा’च्या गोविंदांनी मोठ्या जिद्दीने तब्बल 7 थर लावून दहीहंडीला यशस्वी सलामी दिली. प्रसारमाध्यमांतून दिलेल्या माहितीनुसार या पथकाला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणे अपेक्षित होते. मात्र, थर लावल्यानंतर सुभाष चौक मंडळाच्या आयोजकांनी 51 हजार रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला आणि गोविंदांच्या हातात केवळ 5 हजार 100 रुपये टेकवण्याचा प्रयत्न केला. आयोजकांच्या या भूमिकेमुळे गोपाळ पेठ मंडळाचे गोविंदा कमालीचे संतप्त झाले. “आम्ही गेल्या महिन्याभरापासून सातत्याने थर लावण्याचा सराव करत आहोत. या सरावात अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही 7 थर लावून सलामी दिली, पण आयोजक मात्र नाममात्र पैसे देऊन आमची दिशाभूल करत आहेत,” असा थेट आरोप गोविंदांनी केला. भविष्यात इतर कोणत्याही पथकाची अशी फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही आक्रमक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत आयोजकांकडून जाहीर केलेली 51 हजार रुपयांची पूर्ण रक्कम दिली जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका गोविंदांनी घेतली. या मागणीसाठी त्यांनी हंडीच्या खालीच रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परिसरात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या तणावपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Source link
जळगावात दहीहंडीच्या बक्षीसावरून मोठा राडा:51 हजारांऐवजी 5100 रुपये दिल्याने गोविंदांचा 'रस्ता रोको'