![]()
भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि एफएन ब्राउनिंग ग्रुपची उपकंपनी एफएन हर्स्टल यांच्यात भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक करार झाला आहे. या भागीदारीमुळे भारतात लहान शस्त्रे, एकात्मिक शस्त्रप्रणाली आणि मानवरहित हवाई प्रणालींविरोधी (काउंटर-यूएएस) क्षमता वाढवण्यावर लक्ष दिले जाईल. या करारानुसार, दोन्ही कंपन्या भारतात स्वतंत्र उत्पादन केंद्र उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करतील. भारतीय बाजारपेठेच्या गरजा पाहून संरक्षण उत्पादने बनवण्यासाठी धोरणात्मक भागीदारी किंवा संयुक्त कंपनी स्थापन करण्याचाही विचार केला जाईल. स्थानिक उत्पादन, तंत्रज्ञान सहकार्य आणि देशांतर्गत मूल्यनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना मिळेल. या भागीदारीत केएसएसएलच्या अभियांत्रिकी कौशल्य आणि मोठ्या उत्पादन क्षमतेचा वापर केला जाईल. तसेच एफएन हर्स्टलचा लहान शस्त्रे आणि एकात्मिक शस्त्रप्रणाली क्षेत्रातील १३५ वर्षांहून अधिक अनुभवही उपयोगी पडेल. यातून भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी आधुनिक संरक्षण प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतात येईल. तसेच देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमता मजबूत होईल. एफएन ब्राउनिंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलियन कॉम्पेरे यांनी म्हटले की, या सहकार्यामुळे भारतीय सशस्त्र दलांसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या स्वदेशी संरक्षण क्षमता विकसित करण्यास मदत होईल. दोन्ही कंपन्या भारतीय संरक्षण क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विविध सहकार्य प्रकल्पांचा एकत्र अभ्यास करतील आणि त्यांचा आढावा घेतील.
Source link
भारतात लघु शस्त्रे, ‘काउंटर-यूएएस’ प्रणालींचे उत्पादन वाढणार:कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्सची एफएन हर्स्टलसोबत भागीदारी; स्वतंत्र उत्पादन केंद्र उभारण्याचा अभ्यास