Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?




महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, मला असे वाटतेय बारामतीच्या मोठ्या ताई त्यांनी म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डीबेट करायला तयार आहे. ताईंनी जितके प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवेंद्रजींनी त्यात म्हटले आहे की माझे समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डीबेट करायला तयार आहे. म्हणजे पवार साहेब यांनी जर विनंती केली आणि ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डीबेट करतील, असे म्हणत वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील महिला विधेयकाला विरोध केला. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, दुर्दैव आहे की ज्या महिलांनी, ज्या महिला खासदारांनी विरोध केला, या सगळ्या कुठल्या न कुठल्या राजकीय पार्श्वभूमीच्या महिला आहेत. कोणाचे वडील आहेत, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे. आज या 33 टक्क्यांची आवश्यकता होती, ज्यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे की सर्वसाधारण ज्यांच्या मागे कुठल्याही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, अशा महिला संसदेतही येणार होत्या आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेतही येणार होत्या. पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याचा चक्काचूर करण्याचे काम यांनी केले आहे. आणि त्यात महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत, त्यांचाही समावेश आहे, हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला हे आणखी दुर्दैव आहे. मला त्यांना सांगायचे आहे की नक्की जल्लोष कराच तुम्ही, आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, तो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रा वाघ म्हणाल्या, संसदेत इतक्या सध्या सोप्या भाषेत हे बिल समजावले आहे, या बिलावर जे काही आक्षेप होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्याचे निरासण करण्यात आले आहे. असे असून सुद्धा जर सभागृहात बसलेल्या महिला प्रश्न विचारात असतील तर मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यावरच आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *