Headlines

फुलोऱ्यात आलेल्या पिकांना मिळेना पाणी:ऐन पावसाळ्यात धरणांत पाणी नाही; मराठवाड्यात 6 लाख हेक्टरला फटका




मराठवाड्यात या वर्षी धरणसाठ्यांतील परिस्थिती गंभीर झाली आहे. एकीकडे कोरडवाहू क्षेत्राला फटका बसत असताना मराठवाड्याच्या सिंचन क्षेत्राला जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास त्याचा मोठा फटका मराठवाड्याला बसणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याचे निम्म्यापेक्षा अधिक सिंचन क्षेत्र घटणार असल्यामुळे किमान ८ लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. मराठवाड्यात या वर्षी केवळ ३८८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अपेक्षित सरासरीच्या केवळ ७० टक्केच पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील एकमेव मोठे जायकवाडी धरण भरले आहे. दरम्यान, मराठवाड्यात सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के, दुधना प्रकल्पात २३ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात २५ टक्के, मांजरा धरणात १३ टक्के, माजलगाव प्रकल्पात २५ टक्के आणि सिद्धेश्वर प्रकल्पात ३५ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पांतून सिंचन होण्याची स्थिती सध्या नाही. केवल जायकवाडी धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे जायकवाडीतून सिंचन होणार आहे. मात्र, जायकवाडीच्या सिंचनालादेखील खराब कालव्यांचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा मोठा फटका बसत आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा धरण संख्या २०२६ २०२५
मोठे प्रकल्प ११ ६८ ९९
मध्यम प्रकल्प ७६ २२ ८३
लघु प्रकल्प ७८० २१ ७५
(पाणीसाठा टक्क्यांमध्ये) नियोजन करण्याचे निर्देश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांनी याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना ज्या प्रकल्पांतून सिंचन होणार आहे, त्या सिंचनाच्या नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. जिथे ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असेल, त्या धरणांतून सिंचन करता येणार नाही; मात्र जेथे पाणीसाठा उपलब्ध आहे, तेथे नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात यावर्षी मध्यम आणि लघु प्रकल्पांतील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाड्यातील सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाला याचा फटका बसणार आहे. एक्स्पर्ट व्ह्यू पावसाने पाठ फिरवल्याचा ओलिताखालील ५० टक्के शेतीला फटका जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगितले की, मराठवाड्यात ११ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन होते. त्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पांत सर्वात भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्यातील ७६ मध्यम प्रकल्पांच्या माध्यमातून १ लाख ८६ हजार हेक्टर सिंचन होते, तर ७८० लघु प्रकल्पांच्या माध्यमातून ३ लाख ३८ हजार हेक्टर सिंचन होते. मोठ्या प्रकल्पांतून ६ लाख ७१ हजार हेक्टर सिंचन होते. त्यामुळे सात लाख हेक्टरपेक्षा अधिक सिंचनाला फटका बसू शकतो. मराठवाड्यातील मध्यम (२२ टक्के) आणि लघु प्रकल्पांत (२१ टक्के) पाणीसाठा आहे. त्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांतून मराठवाड्यात सिंचन होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अशीच स्थिती राहिल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *