![]()
युवक काँग्रेसने राज्यात ‘पाच अभियानां’ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली जातील. शिवराज मोरे यांनी सांगितले की, समाजात, विशेषतः ग्रामीण भागात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जात विचारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही बाब चिंताजनक असून, लहान मुलांमध्येही ही प्रवृत्ती दिसून येत आहे, जी समाजासाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी ताकद म्हणून युवक काँग्रेस उभी राहावी, या उद्देशाने ‘रोहित वेमुला अभियान’ सुरू करण्यात येत आहे. अंधश्रद्धेविरोधात लढा देण्यासाठी ‘दाभोळकर अभियान’ राबवले जाईल. या अंतर्गत ग्रामीण भागात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली जाईल. ‘पानसरे अभियान’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक इतिहासाची माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करेल. इतिहासाचे विकृतीकरण थांबवून योग्य विचार पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ‘कलबुर्गी अभियान’ आणि ‘गौरी लंकेश अभियान’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारस्वातंत्र्य याबाबत जागृती करतील. पत्रकारांमध्ये वाढत चाललेली भीती आणि दबाव यावरही या मोहिमेतून आवाज उठवला जाईल, असे मोरे यांनी नमूद केले. अभिषेक अवचार यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून समाजप्रबोधनासाठी आहे. टीका आणि विरोध सहन करत हे काम सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी विज्ञान परिषद, पदयात्रा, चर्चासत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जनजागृती केली जाईल. या अभियानाची सुरुवात पुण्यातून होणार असून, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पहिला मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात मोहिमेची सविस्तर रूपरेषा मांडली जाईल. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने येथून दिलेला संदेश संपूर्ण राज्यात पोहोचतो, त्यामुळे सुरुवात पुण्यातून केली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Source link
युवक काँग्रेसकडून ‘पाच अभियानां’ची घोषणा:सामाजिक तणाव, जातीय प्रश्न, अंधश्रद्धेविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम