![]()
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सेस फंडामधील ८० लाख रुपयांच्या निधीच्या वाटपावरून मंगळवारी झालेल्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ‘राडा’ झाला. विरोधकांना निधी न देण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेच्या सदस्याने थेट सभेचा अजेंडा फाडून फेकून दिला. वाढता गोंधळ पाहून सभापतींनी थेट राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली. यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी सभागृहाबाहेर आंदोलन करत सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी दुपारी दीड वाजता सभापती कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सुरू झाली. या सभेत प्रामुख्याने ८० लाख रुपयांच्या सेस निधीचा मुद्दा गाजला. या निधीमध्ये सत्ताधारी सदस्यांच्याच गावांनाच निधी देण्यात आला होता. याला सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या शिवसेनेचे सदस्य अनुराग शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी संतापाच्या भरात सभेच्या कार्यवृत्ताची प्रत फाडून थेट सभागृहात भिरकावली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते दत्तात्रय वर्पे आणि इतर सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिला. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बहुमताने ठराव मंजूर झाल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले. सभागृहातील गोंधळ आटोक्यात येत नसल्याचे पाहून, सभापती गायकवाड यांनी थेट राष्ट्रगीत सुरू करण्याचे आदेश दिले आणि सभा तहकूब केली. सभेचे कामकाज अशा प्रकारे गुंडाळल्याने संतप्त सर्व सदस्यांनी पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर येऊन सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर, प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि त्यांना सभागृहात नेऊन चर्चा केली. यानंतर सत्ताधाऱ्याना चार लाख तर विरोधकांना ३ लाख देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी उपसभापती गाढे यांच्यासह अधिकारी व सदस्य उपस्थित होते. सभापती कल्याण गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेतील गटाच्या राजकारणात भाजपची कोंडी भाजप शिवसेना सत्तेमध्ये सोबत आहे. मात्र याठिकाणी शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याने त्यांच्यातच अंतर्गत वाद सुरु झाले आहे. सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून भाजप एका गटाला जवळ करत असला तरी दुसरा गट मात्र नाराज आहे. उबाठाने सत्ता स्थापनेवेळी अनुपस्थित राहून एक प्रकारे सत्ता स्थापनेसाठी सहकार्यच केले आहे. मात्र त्यांना देखील निधी मिळत नसल्याने ते देखील नाराज आहेत. शिवसेनेच्या गटाच्या राजकारणात भाजपच्या सभापतींची मात्र पुरती कोंडी झाली आहे. गैरसमज दूर झाला Ãनिधी वाटपाचे अधिकार सभागृहाला आहेत. सर्व पंचायत समिती गणाला न्याय मिळावा ही अपेक्षा असते. किरकोळ गैरसमज होते, समजून सांगितल्यावर सर्वांचे समाधान झाले आहे. शिवाजी साळुंके, प्र. बीडीओ
Source link
अजेंडा फाडून सदस्यांचे ठिय्या आंदोलन:सत्ताधाऱ्यांनीच 80 लाखांच्या सेस निधीचे नियोजन केल्याने पंचायत समितीत ‘राडा', सर्वच सदस्यांना निधी देण्याचे दिले आश्वासन