![]()
गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर (वय 45) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहाथ पकडले. मांजरी परिसरात मंगळवारी (दि. 8) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 57 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(3), 318(5) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर यांच्याकडे होता. तक्रारीनुसार, संबंधित गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी बाबर यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारदारांचा मुलगा प्रतीक याच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान बाबर यांनी दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे समोर आले. त्यानंतर विभागाने मांजरी येथील पंधरा चौक, शीतलादेवी मंदिरासमोर सापळा रचला. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता बाबर यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून स्वतःच्या कारमध्ये 50 हजार रुपये स्वीकारले. त्याच वेळी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. बाबर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुरेश गायकवाड या प्रकरणाचा तपास करत असून, पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Source link
पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:अटकपूर्व जामिनात मदतीसाठी-दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपये स्वीकारले