Headlines

शालार्थ आयडी घाेटाळा:संभाजीनगरात 10 हजार फायलींची तपासणी सुरू, एसआयटीच्या पथकाकडून 5 जिल्ह्यांतील फायलींची झडती




राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाच्या कामाला वेग आला आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागात गुरुवारपासून संचिकांची (फाइल्स) कडक तपासणी सुरू झाली आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकाने मीपाच्या (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था) नवीन इमारतीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या ५ जिल्ह्यांतील तब्बल १० हजार ४९ संचिका तपासणीसाठी घेतल्या आहेत. यावेळी पाचही जिल्ह्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कागदपत्रांसह उपस्थित होते. या मोहिमेत २०१९ ते २०२५ या कालावधीत दिलेल्या वैयक्तिक आणि शालार्थ आयडी मान्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. बनावट नियुक्त्या, विनाअनुदानितवरून अनुदानित तुकड्यांवर केलेल्या बेकायदा बदल्या तसेच शिक्षकेतर पदांवरून शिक्षक पदावर दिलेल्या नियमबाह्य मान्यता यांसारख्या गंभीर बाबींवर पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारीही सुरू राहणार आहे. या घोटाळ्यात यापूर्वी माजी शिक्षण उपसंचालक आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या माजी सचिवांना अटक केली होती. तसेच काही अधिकाऱ्यांचे निलंबनही केले आहे. तक्रार नसलेल्या फायलीही रडारवर या तपासणी मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी केवळ तक्रार असलेल्याच नव्हे, तर तक्रारी नसलेल्या संचिकांचीही तपासणी सुरू केली आहे.तपासणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *