![]()
गणेशोत्सव सर्वांना मिळून साजरा करायचा आहे. हा उत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करून मनमाडकरांनी चांगला आदर्श घालून द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात डीजेच्या संदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर लहान मुले डीजेच्या आवाजाने सुरक्षित राहतील का? वयोवृद्ध माणसांना काही त्रास होईल का? कोणाला हार्ट अ टॅक येईल का? एखाद्या इमारतीला तडे जातील का? वाद्यांमुळे काय होईल, याचा विचार करण्याची जबाबदारी ही तरूण पिढीची आहे. ही तरूण पिढी पुढच्या येणाऱ्या पिढीला आदर्श घालून देणारी असते. या पार्श्वभूमीवर मनमाडकर गणेशोत्सव साजरा करतील, अशी अपेक्षा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी व्यक्त केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस स्टेशनतर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे मान्यवर, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी शहर पोलिस निरिक्षक विजय करे यांनी प्रास्तविकात गणेशोत्सव काळात मंडळांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे, याबाबत माहिती दिली. गणेश मंडळांनी डीजेच्या आवाजाची मर्यादा कमी ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी राजाभाऊ भाबड, रविशंकर गुप्ता, अशोक व्यवहारे, गंगाभाऊ त्रिभुवन, नाना शिंदे, नितीन पांडे, सुनील हांडगे आदींनी विविध सूचना मांडल्या. यात प्रामुख्याने खंडित वीज पुरवठा, मोकाट जनावरांचा उपद्रव, रस्त्यांवरील खड्डे आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. महावितरण कंपनीचे शहर अभियंता सुनील कुमावत यांनी गणेश उत्सव काळात अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सूचनांचा आढावा घेतला. शहराच्या विविध भागांत सध्या दोन महत्वाची कामे सुरू आहेत. त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गैरसोय झाली व होत आहे. यावर पालिकेने मुरूम व खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम केले, तर भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्याच्या मधोमध झालेले खड्डे काँक्रिट टाकून दुरूस्त करण्यात येत आहे, असे सांगितले. नांदूरशिंगोटेत सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांचे आवाहन प्रतिनिधी | नांदूरशिंगोटे नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्र हद्दीच्या गावातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीची बैठक पार पडली. गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गणेशभक्तांना मार्गदर्शन केले. येथील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात वावीचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनिरीक्षक सी. एम. चव्हाण, शहाजी शिंदे यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कामगार, पोलिस पाटील, ज्येष्ठ नागरिक व गणेशभक्त उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गणेश मंडळाने अधिकृत परवानगी घ्यावी, मंडळाने गणेशमूर्ती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, असे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, डीजेमुक्त मिरवणुका, पारंपरिक वाद्यांचा वापर, ध्वनीप्रदूषण टाळणे आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव व्हावा, यासाठी मंडळांनी आकर्षक आरास, देखावे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले. ‘श्रीं’च्या मिरवणुका राष्ट्रीय महामार्गावरून नेऊ नये श्रींच्या स्थापनेची व विसर्जन मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून नेण्यात येऊ नये, श्रींची विसर्जन मिरवणूक वेळेत काढावी आणि १० वाजेपर्यंत सर्व मिरवणुका गणेश कुडांजवळ येतील, असे नियोजन करावे, प्रत्येक मंडळाने रितसर परवानगी घ्यावी, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, स्वयंंसेवक नेमावे, असे आवाहन करे यांनी केले. शहर व ग्रामीण परिसर मिळून १०८ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यामुळे मंडळाच्या बंदोबस्ताचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Source link
शांतता समिती बैठक:डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळा, मनमाड शहरातील गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन