![]()
दुष्काळी परिस्थितीत विहिरीच्या पाण्यावर कष्टाने जोपासलेल्या डाळिंब बागांवर चोरट्यांची नजर पडल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बिलपुरी (ता. सटाणा) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पितांबर दिलीप पवार यांच्या गट क्रमांक २०/३ मधील दोन एकर २७ गुंठे क्षेत्रातील बागेतून चोरट्यांनी सुमारे १३५ किलो डाळिंब चोरून नेले. चार गोण्यांत भरलेले डाळिंब दोन दुचाकींवरून मालेगाव येथे विक्रीसाठी नेत असताना वडनेर पोलिसांच्या गस्ती पथकाने त्यांना हटकले. चौकशीत चोरीचा प्रकार उघडकीस आला. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी टँकरने पिकांना पाणी देऊन ती वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीपासून ते झाडांना आधार देण्यापर्यंतचा खर्च कर्ज काढून करीत आहेत. पितांबर पवार यांनीही दुष्काळात विहिरीतील पाण्यावर बाग जोपासली होती. डाळिंब परिपक्व झाले असून विक्रीसाठी ते व्यापाऱ्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांत संपूर्ण मालाची विक्री होणार असतानाच चोरी झाल्याने त्यांचे नुकसान झाले. यापूर्वीही अनेक वेळा याच बागेतून डाळिंब चोरीला गेल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नामपूर दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दादाभाऊ मगरे यांनी तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, एका फरार संशयिताचा शोध सुरू आहे. संशयितांकडून दोन दुचाकी व १३५ किलो डाळिंब असा सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक शिलावट व पोलिस नाईक भूषण मोरे यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बागेसाठी कर्जाचा आधार दुष्काळामुळे डाळिंब बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. छाटणी, खते, औषधे, मजुरी आणि झाडांना आधार देण्याचा खर्च वाढल्याने अनेक उत्पादक कर्जाच्या आधारावर बागा जोपासत आहेत.
Source link
काटवन परिसरात डाळिंब बागांवर चोरट्यांचा डोळा; 135 किलो चोरी:नामपूर पाेलिसांनी जप्त केला 90 हजारांचा ऐवज, तिघे संशयित ताब्यात