Headlines

बोरदहेगाव धरण क्षेत्रात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो बैलपोळा:गायी-बैलांना आजारातून मुक्त करणारे एकमेव दैवत; दर्शनासाठी पशुधनाची गर्दी‎‎




वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात वसलेले जुने गोळवाडी हे गाव अन् तिथले ग्रामदैवत ‘गवळीबाबा’. संपूर्ण वैजापूर तालुक्यात आणि परिसरात गायी, बैल आणि पाळीव प्राण्यांना आजारातून मुक्त करणारे एकमेव जागृत दैवत म्हणून गवळीबाबा देवस्थानाची मोठी ख्याती आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भरणारा जनावरांचा पोळा हे या परिसराचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. बोर दहेगाव मध्यम प्रकल्पामुळे जुने गोळवाडी गाव पूर्णपणे विस्थापित झाले असून गावाचे पुनर्वसन झाले आहे. गावकऱ्यांनी गवळीबाबांच्या मंदिराचा नवीन गावात जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला, परंतु जुन्या जागेवरील गवळीबाबांची मूर्ती हलवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर आहे त्याच जुन्या ठिकाणी आजही नित्यनियमाने पूजा-अर्चा केली जाते. विशेष म्हणजे, धरण शंभर टक्के भरले तरी गवळीबाबांचे हे स्थान कधीही पाण्याखाली जात नाही, अशी तीव्र श्रद्धा आणि प्रत्यक्ष अनुभव गावकऱ्यांचा आहे. या अनोख्या उत्सवासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी गोळवाडीतील तरुण मृत्युंजय मित्र मंडळाच्या वतीने काजू-बदामाचा शिरा, पुलाव-खिचडीचा प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. गावातील संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन या दिवशी सेवा बजावतात. पोळ्याचा दुसरा दिवस आणि कार्तिकी पौर्णिमेची यात्रा हे गोळवाडीतील दोन मोठे उत्सव मानले जातात. गवळीबाबांच्या नावावरूनच या गावाला ‘गोळवाडी’ हे नाव पडल्याचे जुने ग्रामस्थ सांगता. प्राण्यांवर असीम श्रद्धा असणारे हे स्थान संपूर्ण परिसरात आजही एका अनोख्या परंपरेची साक्ष देत उभे आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच गोळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर जनावरांची गर्दी श्रावण अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीला, पहाटेपासूनच गोळवाडीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बैल, गायी, म्हशी, बकऱ्या आणि इतर पाळीव प्राण्यांची रीघ लागलेली असते. गवळीबाबांच्या दर्शनाने जनावरांना कुठलाही आजार होत नाही आणि आजारी जनावरे पूर्णपणे बरी होतात, अशी शेतकऱ्यांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील बहुतांश गावांतील शेतकरी आपल्या लाडक्या प्राण्यांना दर्शनासाठी न चुकता येथे आणतात. या दिवशी परिसराला मोठ्या जत्रेचे आणि पोळ्याचे रूप प्राप्त होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *