Headlines

'आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा':ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा पुरुषोत्तम करंडक समारंभात तरुणाईला सल्ला




कलाक्षेत्रात वाटचाल करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. विविध कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्याला आवडते काय व येते काय, यातील फरक ओळखून पुढे जा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी तरुणाईला दिला. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हा समारंभ पुणे येथील भरत नाट्य मंदिरात झाला. भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या प्रशांत दामले यांच्या हस्ते विजेत्या संघांना पुरस्कार देण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला. पारितोषिक स्वीकारताना विद्यार्थ्यांनी ‘आवाज कुणाचा’, ‘आमचे नाटक आम्हीच बसवितो’, ‘आमचे नाटक आम्हीच लिहितो’, ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल’ अशा घोषणा देत जल्लोष केला. या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि डॉ. विजयकुमार जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. जोशी यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विद्यार्थी लेखकांच्या संहितांचा अभ्यास करून त्यावर प्रबंध सादर केला होता. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, प्राथमिक फेरीचे परीक्षक प्रसाद शिरगावकर, अमृत सामक आणि अंतिम फेरीचे परीक्षक निपुण धर्माधिकारी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरुषोत्तम करंडक पटकावणाऱ्या भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ची ‘लाजाळू’ ही एकांकिका सादर झाली. प्रशांत दामले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कुणीही परिपूर्ण नसते, त्यामुळे एकमेकांना मदत करत पुढे जावे. त्यांनी स्वतःच्या कलाप्रवासाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, मी १९७८ ते १९८२ पर्यंत मॉब आर्टिस्ट म्हणून काम केले. तो काळ खूप काही शिकवणारा होता, कारण प्रेक्षकांच्या खऱ्या प्रतिक्रिया तिथेच समजतात. ‘टुरटुर’ नाटकामुळे रंगदेवतेची कृपा झाली आणि माझा प्रवास सुरू झाला. मला उत्तम निर्माते आणि सहकलाकार मिळाले. कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने काम करणे, स्पर्धेचे भान ठेवणे आणि एकाग्रता या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. रंगमंचावर बोलताना स्वतःचे बोलणे नीट ऐकले पाहिजे, पाठांतर चोख हवे आणि बोललेल्या प्रत्येक वाक्यातील शेवटचे अक्षर स्पष्टपणे ऐकू आले पाहिजे, ही पथ्ये पाळणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. परीक्षकांच्या वतीने प्रसाद शिरगावकर,अमृत सामक आणि निपुण धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विषयांचे वैविध्य, आशयाची खोली, तांत्रिक सफाई, विद्यार्थी लेखकांची संख्या आणि परिपक्व हाताळणी या घटकांचे कौतुक केले. शिरगावकर म्हणाले की, हे व्यासपीठ स्वतःमधील कलाकार घडवणारे आहे.धर्माधिकारी यांनी सांगितले की, कलोपासक संस्थेचा हा उपक्रम केवळ स्पर्धेपुरता न घेता, स्वतःचे हक्काचे व्यासपीठ समजावे आणि आजचे स्पर्धक हे उद्याचे सहकारी आहेत,या भावनेने काम करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *