![]()
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तपोवन येथील शेतकरी श्रीराम पाटील यांचा तरुण मुलगा शेखर याने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली. शेतीच्या नुकसानीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा समज झाल्याने शासनाकडून पाटील यांना एक लाख रुपयांची मदत मिळाली होती. मात्र, काही महिन्यांनी घरात सापडलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण केवळ वैयक्तिक असल्याचे स्पष्ट झाले. हे सत्य समोर येताच या स्वाभिमानी पित्याने खोटा पैसा नको, असा विचार करून शासनाची एक लाख रुपयांची मदत मंत्र्यांकडे परत करून समाजात प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे.त्यांच्या या कृतीची सर्वत्र सध्या चर्चा आहे. ११ सप्टेंबर रोजी नेरीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीराम पाटील व त्यांच्या पत्नीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि एक लाख रुपयांचा धनादेश त्यांना परत केला. “आमचा स्वाभिमान हा पैसा आम्हाला जवळ ठेवू देत नाही,” असे सांगताना या मृत मुलाच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाला उपस्थितांनी दाद दिली.
Source link
मुलाची आत्महत्या नुकसानीने नव्हे:जामनेरातील मुलाच्या आत्महत्येनंतर मिळालेली 1 लाखांची शासकीय मदत पित्याने सरकारला केली परत